Wednesday, April 22, 2026 10:45:55 PM

Women's Cricket: वनडे क्रिकेटमध्ये नवा जागतिक विक्रम; 'या' खेळाडूच्या नाबाद 179 धावांच्या जोरावर न्यूझीलंडचा ऐतिहासिक विजय

न्यूझीलंडच्या महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

womens cricket वनडे क्रिकेटमध्ये नवा जागतिक विक्रम या खेळाडूच्या नाबाद 179 धावांच्या जोरावर न्यूझीलंडचा ऐतिहासिक विजय

Women's Cricket: 1 एप्रिल 2026 हा दिवस महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी कोरला गेला आहे. न्यूझीलंडच्या महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. या ऐतिहासिक विजयाची शिल्पकार ठरली ती न्यूझीलंडची स्टार फलंदाज आणि कर्णधार अमेलिया केर. तिने वादळी फलंदाजी करत नाबाद 179 धावांची खेळी साकारली आणि अशक्य वाटणारे आव्हान लीलया पेलले.

दक्षिण आफ्रिकेचे 346 धावांचे डोंगरासारखे आव्हान
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सुरु असलेल्या वनडे मालिकेतील दुसरा सामना अत्यंत चुरशीचा ठरला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 346 धावांची भक्कम धावसंख्या उभारली होती. दक्षिण आफ्रिकेकडून ॲनेके बॉशने 90 चेंडूंत 91 धावांची स्फोटक खेळी केली, तर कर्णधार लॉरा वॉल्व्हार्डने 69 धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकांत क्लोई ट्रायॉनने अवघ्या 25 चेंडूंत 52 धावा कुटल्यामुळे न्यूझीलंडसमोर 347 धावांचे विशाल लक्ष्य उभे राहिले होते.

अमेलिया केरचा 'वन मॅन शो'; 139 चेंडूंत 179 धावा
347 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर सुझी बेट्स स्वस्त्यात बाद झाल्यानंतर अमेलिया केर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आली. एका बाजूने गडी बाद होत असताना अमेलियाने मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समाचार घेणे सुरूच ठेवले. तिने 139 चेंडूंत 23 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 179 धावांची खेळी केली. तिला इसाबेला गेझने 68 धावा करून मोलाची साथ दिली. न्यूझीलंडने हे लक्ष्य 49.4 षटकांत गाठून क्रिकेट विश्वाला थक्क केले.

हेही वाचा - Beyers Swanepoel : सामना अर्ध्यावर सोडला अन् थेट विमानतळ गाठलं; बेयर्स स्वानपोलच्या 'त्या' निर्णयाने क्रिकेट विश्वात खळबळ

भारतीय महिला संघाचा विक्रम मोडीत
या विजयासह न्यूझीलंडने भारतीय महिला संघाचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी महिला वनडेमध्ये सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम भारताच्या नावावर होता. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 338 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 341 धावा केल्या होत्या. मात्र, आता 347 धावांचा यशस्वी पाठलाग करून न्यूझीलंडने या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. अमेलिया केरची ही खेळी महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळींपैकी एक मानली जात आहे.


सम्बन्धित सामग्री