Thursday, March 12, 2026 10:37:53 PM

India vs Pakistan : पाकिस्तानची टीम इंडियासमोर नवीन अट; 'हा' करार झाला तरच रंगणार महामुकाबला

पाकिस्तान सरकारने भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिल्याने पेच निर्माण झाला होता. आता 'क्रिकबझ'च्या अहवालानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एक नवीन अट घातली आहे.

india vs pakistan  पाकिस्तानची टीम इंडियासमोर नवीन अट हा करार झाला तरच रंगणार महामुकाबला

India vs Pakistan : 2026 च्या टी-20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्याबाबत सध्या संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आयसीसीच्या वेळापत्रकानुसार, हे दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी 15 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथे भिडणार होते. मात्र, पाकिस्तान सरकारने भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिल्याने पेच निर्माण झाला होता. आता 'क्रिकबझ'च्या अहवालानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एक नवीन अट घातली आहे. जर भारताने पाकिस्तान आणि बांगलादेशसोबतच्या 'त्रिकोणी मालिकेत' (Tri-series) सहभागी होण्यास मान्यता दिली, तरच पाकिस्तान संघ विश्वचषकात भारताविरुद्ध खेळेल. ही मालिका एखाद्या तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे.

22 अब्ज रुपयांची कमाई धोक्यात 
भारत-पाकिस्तान सामना हा केवळ खेळ नसून जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठे महसूल देणारे साधन आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका भारत-पाकिस्तान सामन्यातून अंदाजे 250 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (22 अब्ज भारतीय रुपयांपेक्षा जास्त) कमाई होते. जर हा सामना झाला नाही, तर आयसीसी (ICC) आणि ब्रॉडकास्टर्सना प्रचंड आर्थिक फटका बसू शकतो. विशेष म्हणजे, पीसीबीच्या एकूण उत्पन्नापैकी सुमारे 80 टक्के हिस्सा आयसीसीच्या महसुलातून येतो. जर सामना रद्द झाला, तर आयसीसी पाकिस्तानचा वाटा रोखू शकते, ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची भीती आहे.

वादाची ठिणगी आणि बांगलादेशचे कनेक्शन 
या वादाचे मूळ बांगलादेश क्रिकेट संघाशी जोडलेले आहे. आयपीएल 2026 मधून बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला वगळण्यात आल्यानंतर, बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात होणाऱ्या विश्वचषक सामन्यांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली होती. बांगलादेशशी एकता दर्शवण्यासाठी पाकिस्ताननेही भारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला पाकिस्तान संपूर्ण विश्वचषकावर बहिष्कार टाकणार असे वाटत होते, परंतु आता त्यांनी केवळ भारताविरुद्धच्या सामन्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

हेही वाचा - India Vs Pakistan Match: काय घडलं लाहोरच्या 'त्या' गुप्त बैठकीत? भारत-पाकिस्तान मॅचबद्दल मोठी अपडेट समोर

बीसीसीआयच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष 
पाकिस्तानने टाकलेल्या या 'गुगली'वर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) काय भूमिका घेणार, याकडे क्रीडा विश्वाचे लक्ष लागले आहे. सध्या आयसीसी किंवा इतर कोणत्याही बोर्डाने या प्रस्तावाबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, 15 फेब्रुवारीचा सामना पार पडण्यासाठी आयसीसी पडद्यामागे हालचाली करत असून, महसुलाचे नुकसान टाळण्यासाठी ही अट मान्य केली जाणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


सम्बन्धित सामग्री