मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर बरेच भारतीय वरिष्ठ खेळाडू रणजी करंडक खेळताना दिसणार आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पराभवानंतर बीसीसीआयने खेळाडूंना रणजी करंडक खेळण्याचा सल्ला दिला होता. बऱ्याच वेळा जास्त सामने होत असल्याने मोठे खेळाडू डोमेस्टिक क्रिकेटला मुकताना दिसतात. पण, यावेळी मात्र भारताचे मुख्य खेळाडू रणजी सामना खेळताना दिसणार आहेत. रणजी खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नवीन नावे सामिवष्ट होतच होती त्यात अजून एक नाव जोडले गेले आहे.
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सौराष्ट्रसाठी रणजी सामना खेळणार आहे. सौराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष हिमांशू शाह यांनी ही माहिती दिली आहे. हा सामना 23 जानेवारीपासून सुरु होणार असून सौराष्ट्र दिल्ली विरुद्ध खेळताना दिसेल. हा सामना 'क' गटाचा सामना आहे. सौराष्ट्रच्या निरंजन शाह क्रिकेट ग्राउंडवर हा सामना खेळवला जाणार आहे . रवींद्र जडेजा सध्या तरी एका सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे अशी माहिती समोर येत आहे.
रवींद्र जडेजाने भारतासाठी 80 कसोटी सामने खेळले आहेत. 80 सामन्यात जडेजाने 3370 धावा केल्या असून 323 बळीदेखील घेतले आहेत. त्याचसोबत जडेजाने 197 एकदिवसीय व 74 टी 20 सामने खेळले आहेत. 174 एकदिवसीय सामन्यात त्याने 2756 धावा केल्या आहेत व 220 बळी घेतले आहेत. 2024 च्या टी 20 वर्ल्ड कप नंतर त्याने आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यातून निवृत्ती घेतली होती. टी 20 मध्ये भारतासाठी त्याने 515 धावा केल्या असून 74 बळीदेखील घेतले आहेत.