Tuesday, March 17, 2026 02:33:25 PM

PM Modi Israel Visit: पंतप्रधान मोदींचा 9 वर्षांनंतर ऐतिहासिक इस्रायल दौरा; संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवे पर्व सुरू होणार

तब्बल 9 वर्षांच्या प्रदीर्घ अंतरा नंतर पंतप्रधान मोदी इस्रायलला भेट देणार असून, त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच इस्रायल दौरा असेल.

pm modi israel visit पंतप्रधान मोदींचा 9 वर्षांनंतर ऐतिहासिक इस्रायल दौरा संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवे पर्व सुरू होणार

PM Modi Israel Visit:  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच इस्रायलच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्लीत 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान आयोजित 'एआय शिखर परिषदे'नंतर (AI Summit) हा दौरा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तब्बल 9 वर्षांच्या प्रदीर्घ अंतरा नंतर पंतप्रधान मोदी इस्रायलला भेट देणार असून, त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच इस्रायल दौरा असेल. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि तांत्रिक संबंधांना नवी गती मिळण्याची अपेक्षा आहे.

2017 मधील ऐतिहासिक भेट आणि मैत्रीचे नाते
पंतप्रधान मोदींनी यापूर्वी जुलै 2017 मध्ये इस्रायलला भेट दिली होती. इस्रायलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले होते. त्यावेळी दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा दौरा झाला होता. या काळात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मोदींचे केलेले अभूतपूर्व स्वागत आणि त्यांची घनिष्ठ मैत्री जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली होती. संरक्षण, सायबर सुरक्षा आणि कृषी क्षेत्रातील सहकार्याचा पाया याच भेटीत घातला गेला होता.

संरक्षण आणि 'मेक इन इंडिया'वर भर
इस्रायल हा भारताचा एक महत्त्वाचा संरक्षण भागीदार आहे. क्षेपणास्त्र प्रणाली, ड्रोन तंत्रज्ञान आणि देखरेख यंत्रणा यांमध्ये दोन्ही देशांचे जुने सहकार्य आहे. आगामी दौऱ्यात "Make in India" उपक्रमांतर्गत संरक्षण साहित्याचे संयुक्त उत्पादन आणि तंत्रज्ञान हस्तांतरण यावर विशेष चर्चा होऊ शकते. उच्च तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात महत्त्वाचे करार होण्याची शक्यता असून, यामुळे भारताची सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे.

हेही वाचा - Ahmedabad Plane Crash: 'देशाच्या तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा...'; अहमदाबाद विमान अपघाताबाबत परदेशी माध्यमांचे दावे सरकारने फेटाळले

बदलत्या भू-राजकारणात भारताचे धोरणात्मक स्वातंत्र्य
मध्य पूर्वेतील सध्याची राजकीय परिस्थिती अत्यंत संवेदनशील आहे. एकीकडे इस्रायल-गाझा संघर्ष आणि दुसरीकडे आखाती देशांच्या स्वतःच्या रणनीती, अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींचा हा दौरा भारताच्या 'धोरणात्मक स्वातंत्र्याचे' (Strategic Autonomy) लक्षण मानले जात आहे. कोणत्याही एका गटाची बाजू न घेता, केवळ राष्ट्रीय हित जोपासत इस्रायल आणि आखाती देशांशी संतुलन राखण्याचे भारताचे परराष्ट्र धोरण या भेटीतून पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे.


सम्बन्धित सामग्री