मुंबई: बीसीसीआयच्या नव्या नियमांनुसार मुख्य भारतीय खेळाडूंना डोमेस्टिक क्रिकेट खेळणे अनिवार्य आहे. या नियमाचं पालन करत भारतीय खेळाडू रणजी करंडक खेळले. पण, त्यांची कामगिरी मात्र निराशाजनक राहिली.
भारताचे मुख्य फलंदाज रोहित शर्मा, रिषभ पंत, यशस्वी जैस्वाल शुभमन गिल त्यांचा संघासाठी रणजी सामना खेळले. हे खेळाडू 23 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान झालेल्या रणजी करंडकाचा फेरीत समाविष्ट झालेले. मात्र या खेळाडूंची कामगिरी चिंताजनक राहिली. त्याच बरोबर इतर मोठे खेळाडू अजिंक्य राहणे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे हे देखील त्यांचा कामगिरीने जास्त प्रभाव टाकू शकले नाहीत.
जम्मू आणि काश्मीर विरुद्ध मुंबई संघाचा सामना होता. या सामन्यात रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, अजिंक्य राहणे, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल खेळात होते. जम्मू आणि काश्मीर सारख्या दुबळ्या संघाने मुंबईला हरवले ते ही या मोठ्या खेळाडूंच्या उपस्तिथीत. रोहित शर्माने पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 28 धावा केल्या तर यशस्वी जैस्वालने 4 आणि 26 धावा केल्या. शिवम दुबे दोन्ही डावात खातंदेखील खोलू शकला नाही. श्रेयस अय्यरने पहिल्या डावात 11 तर दुसऱ्या डावात 17 धावा केल्या. अजिंक्य राहणेने 12 आणि 16 धावांचे योगदान दिले.
सौराष्ट्र विरुद्दच्या सामन्यात रिषभ पंतने पहिल्या डावात 1 तर दुसऱ्या डावात 17 धावा केल्या. रवींद्र जडेजा आणि शुभमन गिलला वगळता सगळ्या खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने निराश केले. गिलने दुसऱ्या डावात 102 धावांची खेळी खेळली. पण तो त्याच्या संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. रवींद्र जडेजाने दिल्ली विरुद्ध पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 7 बळी घेतले तर फलंदाजी करताना 38 धावादेखील केल्या. त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.