मुंबई:यश राठोडच्या अप्रतिम 151 धावांच्या खेळामुळे विदर्भने मुंबईसमोर रणजी ट्रॉफी 2024-25 अंतिम फेरीत पोहचण्यासाठ 406 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी धावसंख्येचा पाठलाग रेल्वेने गेल्या हंगामात त्रिपुराविरुद्ध 378 धावांचा केला होता. मुंबईला अंतिम फेरीत जाण्याकरिता इतिहास रचावा लागेल.
मुंबईच्या फलंदाजांसाठी ही कठीण परीक्षा ठरणार आहे, कारण दिवसअखेर संघाने 73 धावांपर्यंत तीन गडी गमावले होते. कर्णधार अजिंक्य रहाणे अखेरच्या अर्ध्या तासात बाद झाला. विशेष म्हणजे, नंबर 5 वर सूर्यकुमार यादव नव्हे तर शिवम दुबे फलंदाजीला आला. सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण तो विदर्भच्या डावभर मैदानात नव्हता.
मुंबईच्या तीनही विकेट्स डावखुऱ्या फिरकीपटूंनी घेतल्या. या हंगामात 60 पेक्षा जास्त विकेट्स घेतलेल्या हर्ष दुबेने घेतल्या , तर पहिल्या डावात दोन षटकांत रहाणे, सूर्यकुमार आणि दुबेचा बळी घेऊन मुंबईला अडचणीत टाकणाऱ्या पार्थ रेखाडेने रहाणेला स्वस्तात माघारी पाठवले.
विदर्भसाठी दिवसाची मुख्य कहाणी यश राठोडच्या संयमी खेळी ठरली. सुरुवातीच्या संघर्षानंतर त्याने अक्षय वाडकरसोबत 158 धावांची भागीदारी करत डाव सावरला. वाडकरने 200 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले, मात्र शम्स मुलानीच्या गोलंदाजीवर तो बोल्ड झाला. नंतर हर्ष दुबे आणि दर्शन नालकांडे झटपट बाद झाले, कारण खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजीला मदत मिळू लागली होती.
राठोड शेवटचा फलंदाज म्हणून बाद झाला, तेव्हा विदर्भने 400 धावांचा टप्पा ओलांडला होता. मुलानीने 44 षटकांत 85 धावांत 6 गडी घेतले.
विदर्भच्या फिरकीपटूंनी लगेचच नवीन चेंडू घेत मुंबईवर दबाव निर्माण केला. मुंबईने तीन गडी गमावले. अखेरच्या दिवशी मुंबईला इतिहास घडवत 43वे रणजी विजेतेपद पटकवायचे असल्यास काहीतरी मोठे करावे लागेल. सध्या पहिल्या डावातील शतकवीर आकाश आनंद 27 आणि अष्टपैलू शिवम दुबे 12 धावांवर खेळत आहेत. मुंबईला सामना जिंकण्यासाठी 323 धावांची गरज आहे.