केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 10 गडी राखून सहज विजय मिळवत मालिका 2-0 ने जिंकली. चौथ्या दिवशी शेवटच्या सत्रात 58 धावांचे छोटे लक्ष्य आफ्रिकेने फक्त सात षटकांत पार केले. फॉलो ऑननंतर पाकिस्तानने दुसऱ्या डावात 478 धावांचा मोठा डोंगर उभारला होता, मात्र त्याचा फायदा होऊ शकला नाही. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने 2024/25 हंगामात अपराजित राहण्याचा पराक्रम केला असून त्यात नऊ विजय व एक बरोबरीचा समावेश आहे.
टी ब्रेकनंतर पाकिस्तानने सलमान आगा व मोहम्मद रिझवान यांच्या साथीने लढा उभारला. रिझवानने केशव महाराजच्या चेंडूवर चौकार मारत 400 धावांचा टप्पा पार केला. मात्र, महाराजने रिझवानला कव्हर क्षेत्रामध्ये टेंबा बवुमाकडे झेल देण्यास भाग पाडत भागीदारी तोडली. यानंतर आमेर जमालदेखील बाद झाला. आगाही काही वेळाने महाराजच्या चेंडूवर स्लिपमध्ये झेलबाद झाला. जमाल व मीर हमझा यांनी काही धावा जमवण्याचा प्रयत्न केला, पण तेही लवकरच बाद झाले, ज्यामुळे आफ्रिकेसमोर 58 धावांचे छोटे लक्ष्य राहिले.
दुखापतग्रस्त रयान रिकेल्टनच्या जागी सलामीस आलेल्या डेव्हिड बेडिंगमने 30 चेंडूत नाबाद 47 धावांची आक्रमक खेळी केली, ज्यामध्ये पाच चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. एडन मार्क्रमने 14 धावा करून साथ दिली आणि आफ्रिकेने सहज विजय मिळवत सातवा सलग कसोटी विजय साजरा केला.
संक्षिप्त धावफलक:
दक्षिण आफ्रिका 615 (रायन रिकेल्टन 259, टेंबा बावुमा 106, काइल व्हेरेन 100; मोहम्मद अब्बास 3-94, सलमान अली आगा 3-148) व 58/0 (डेव्हिड बेडिंगहॅम 47, एडन मार्क्रम 14) यांचा पाकिस्तान 194 (बाबर आझम 58, मोहम्मद रिझवान 46; कागिसो रबाडा 3-55, केशव महाराज 2-14) व 478 (शान मसूद 145, बाबर आझम 81; मार्को जॅन्सन 2-85) वर 10 गडी राखून पराभव.