U-19 World Cup 2026 : झिम्बाब्वेमधील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळल्या गेलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करत इतिहास रचला आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवली. यापूर्वी भारताने 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये हे विजेतेपद जिंकले होते. विशेष म्हणजे, 2016 पासून भारतीय संघ या स्पर्धेच्या प्रत्येक अंतिम फेरीत पोहोचणारा जगातील एकमेव संघ ठरला आहे.
वैभव सूर्यवंशीचा विक्रमी झंझावात
भारतीय कर्णधार आयुष म्हात्रेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर आरोन जॉर्ज (9) लवकर बाद झाला, मात्र त्यानंतर मैदानावर वैभव सूर्यवंशीचे वादळ आले. वैभवने केवळ 55 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने एकूण 175 धावांची स्फोटक खेळी खेळली, ज्यात 15 चौकार आणि 15 षटकारांचा समावेश होता. ही कोणत्याही १९ वर्षांखालील विश्वचषक फायनलमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. यासोबतच वैभवने युवा एकदिवसीय क्रिकेटमध्ये (Youth ODI) 100 षटकार पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज होण्याचा मान मिळवला. कर्णधार म्हात्रेनेही 53 धावांचे योगदान दिले.
हेही वाचा - Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीचा जागतिक विक्रम; अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये केला 'हा' अनोखा रेकॉर्ड
कनिष्क चौहानची फटकेबाजी आणि भारताचा धावांचा डोंगर
मधल्या फळीत अभिज्ञान कुंडूने 40 धावा केल्या, तर आर.एस. अम्ब्रिसने 18 धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकांमध्ये कनिष्क चौहानने अवघ्या 20 चेंडूत नाबाद 37 धावा कुटल्या, ज्यामुळे भारताने 50 षटकांत 411 धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडकडून जेम्स मिंटोने 3 बळी घेतले.
केब फॉकनरचे शतक व्यर्थ; भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडची शरणागती
412 धावांच्या महाकाय लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने आक्रमक सुरुवात केली. बेन डॉकिन्स (66) आणि बेन मेयेस (45) यांनी खिंड लढवली, मात्र भारतीय गोलंदाजांनी १० व्या षटकापासून सामन्यावर पकड मिळवली. एका क्षणी इंग्लंडची अवस्था 7 बाद 177 अशी झाली होती. तिथून केब फॉकनरने तुफानी फलंदाजी करत केवळ 63 चेंडूत शतक ठोकले. त्याने 115 धावांची झुंजार खेळी केली, पण दुसऱ्या बाजूने साथ न मिळाल्याने इंग्लंडचा डाव 41 व्या षटकात 311 धावांवर आटोपला. भारताकडून आर.एस. अम्ब्रिसने 3, तर दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.