मुंबई : रणजी ट्रॉफीमध्ये दिल्ली विरुद्ध रेल्वे संघाच्या सामन्यात अरुण जेटली स्टेडियमवर विराट कोहलीच्या 12 वर्षांनंतरच्या पुनरागमनाची जोरदार चर्चा होती. मात्र, सामन्यात दिल्लीने मोठा विजय मिळवला असला तरी लक्ष वेधलं ते रेल्वेच्या वेगवान गोलंदाज हिमांशू सांगवानकडे, ज्याने विराटच्या तसेच चाहत्यांच्या आनंदावर पाणी फिरवलं.
29 वर्षीय सांगवानने, ज्याने 2019 मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध प्रथम श्रेणी पदार्पण केलं होतं, विराटचा ऑफ-स्टंप उडवत सामना गाजवला. विराट केवळ 15 चेंडूत 6 धावा करत 23 मिनिटांत बाद झाला, ज्यामुळे संपूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरली. विराट बाद होताच प्रेक्षकांनी मैदान सोडले. विराटची दुसऱ्या डावात फलंदाजी येईल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र, दिल्ली संघ सामना एका डावाने जिंकल्याने विराटची पुन्हा फलंदाजी आली नाही.
कोहलीच्या कमकुवत बाजूवर प्रहार करत सांगवानने बाहेरच्या ऑफ-स्टंपवर गोलंदाजी करण्याऐवजी अप्रत्याशित इनस्विंगर टाकला. हा चेंडू जोरात आत वळत कोहलीच्या बचाव रक्षणाला भेदून त्याचा ऑफ-स्टंप फेकून दिला.
सांगवानने एका मुलाखतीत म्हटलं, "माझ्या बस ड्रायव्हरने मजेत सांगितलं होतं, ‘विराटला बाद करायचं असेल तर पाचव्या स्टंपच्या बाहेर टाक.’ पण मी माझा नैसर्गिक इनस्विंग वापरला आणि फलंदाजाची चूक झाली."
हिमांशू सांगवानच्या या अप्रतिम कामगिरीने तो रातोरात चर्चेत आला आहे. विराटला बाद केल्यावर विराटच्या चाहत्यांकडून ट्रोलिंगदेखील करण्यात आली. हिमांशु सांगवान हा भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असून तो सिनिअर तिकीट कलेक्टर पदावर आहे. हिमांशू त्याच्या या कामगिरीमुळे चर्चेत आला आहे. त्याच्या भविष्यातील कामगिरीवर क्रिकेट रसिकांची नक्कीच नजर असेल.