T20 World Cup 2026: यंदाच्या टी-20 विश्वचषकाच्या तयारीला वेग आला असतानाच एक मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) त्यांचे विश्वचषकातील सामने भारतात खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आयसीसीने बांगलादेशला त्यांचे सामने भारतात खेळणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले होते आणि त्यासाठी एक दिवसाची मुदतवाढही दिली होती. मात्र, बांगलादेशने श्रीलंकेत सामने खेळण्याची मागणी लावून धरल्याने आणि मुदत संपल्याने आता बांगलादेशचा संघ या विश्वचषकातून बाहेर पडल्याचे निश्चित मानले जात आहे.
स्कॉटलंडचा संघ घेणार बांगलादेशची जागा
बांगलादेश स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे पात्रता फेरीत थोडक्यात संधी हुकलेल्या स्कॉटलंड संघाचे नशीब उजळले आहे. ताज्या अहवालांनुसार, आयसीसी बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला मुख्य स्पर्धेत स्थान देणार आहे. स्कॉटलंडला बांगलादेशच्याच गटात समाविष्ट केले जाईल. विश्वचषक सुरू व्हायला केवळ 15 दिवस शिल्लक असल्याने स्कॉटलंडला तातडीने संघ जाहीर करून तयारीला लागावे लागणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आयसीसीकडून कोणत्याही क्षणी अपेक्षित आहे.
हेही वाचा - PV Sindhu : पीव्ही सिंधूचा ऐतिहासिक पराक्रम! 'हा' विजय मिळवणारी ठरली पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू
वेळापत्रकात बदल नाही
बांगलादेश बाहेर पडला असला तरी विश्वचषकाच्या मूळ वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नाही. वेळापत्रकानुसार, ही स्पर्धा 7 फेब्रुवारीपासूनच सुरू होईल. बांगलादेशचे जे सामने नियोजित होते, तेच सामने आता स्कॉटलंडचा संघ खेळणार आहे. 7 फेब्रुवारी रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दुपारी 3:00 वाजता होणारा वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना आता स्कॉटलंड खेळेल. या बदलामुळे केवळ संघाचे नाव बदलणार असून सामन्याच्या वेळा आणि ठिकाणे तीच राहतील.
पहिल्या दिवशी रंगणार तीन मोठे सामने
दरम्यान, 2026 टी-20 विश्वचषकाचा पहिलाच दिवस क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानी ठरणार आहे. 7 फेब्रुवारी रोजी एकूण तीन सामने खेळवले जातील:
पहिला सामना: सकाळी 11:00 वाजता कोलंबोमध्ये पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स.
दुसरा सामना: दुपारी 3:00 वाजता कोलकात्यात वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड.
तिसरा सामना: संध्याकाळी 7:00 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध अमेरिका. भारताचा पहिलाच सामना मुंबईत असल्याने पहिल्या दिवसापासूनच स्पर्धेचा उत्साह शिगेला पोहोचणार आहे.