Fri. Aug 6th, 2021

श्रीशांतच्या क्रिकेट कारकीर्दीला मिळणार नवसंजीवनी?

IPL सामन्यांदरम्यान स्पॉट फिक्सिंगच्या आरोपामुळे श्रीशांतची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली होती. BCCI ने त्याला आजीवन बंदीची शिक्षा सुनावली होती. मात्र आता त्याच्या कारकीर्दीला पुनरूज्जीवन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुप्रीम कोर्टाने BCCI ला श्रीशांतला घातलेल्या आजीवन बंदीवर फेरविचार करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. यामुळे आता श्रीशांतच्या कम बॅकच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

श्रीशांतसाठी आशेचा किरण

२००६ साली नागपूर मध्ये झालेल्या इंग्लंड विरूद्धच्या टेस्ट सिरीजमधून श्रीशांत हा नावारूपाला आला.

मात्र क्रिकेट आणि वाद हे समीकरण श्रीशांतच्या कारकीर्दीला दुर्दैवी वळणावर घेऊन आलं.

खेळाडूंना चिडवणं, विकेट मिळाल्यावर आनंद व्यक्त करण्याची त्याची शैली, एवढंच नव्हे तर चक्क हरभजन सिंगकडून खाल्लेली थप्पड या घटनांमुळे श्रीशांत कायम चर्चेत राहिला.

हे सगळं कमी की काय, तोच 2013 साली झालेल्या IPLमध्ये राजस्थान रॉयल या टीमतर्फे श्रीशांत खेळत असताना त्याला स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

याचाच परिणाम म्हणून त्याला बीसीसीआयने क्रिकेटसाठी आजीवन बंदी सुनावली होती.

या संदर्भातील खटला अद्याप सुरू आहे. दरम्यान श्रीशांतने बिग बॉस तसंच खतरों के खिलाडी यांसारख्या टीव्ही रिऍलिटी शोंमध्येही सहभाग घेतला. या शोंमध्ये तो जिंकू शकला नसला, तरी बऱ्यापैकी चर्चेत राहिला. मात्र या सर्वांदरम्यान त्याच्या क्रिकेटमधील करिअर संदर्भात प्रश्न तसाच होता.  त्याच्यावर असणार्या शिक्षेसंदर्भात BCCI ने फेरविचार करावा, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असल्यामुळे आता श्रीशांतच्या कारकीर्दीत नवी इनिंग सुरू होण्याची शक्यता मात्र निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *