एसटी सेवा पुन्हा सुरळीत

राज्यात गेल्या पाच महिन्यांहून अधिक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. मात्र, आज राज्यातील एसटी सेवा पुन्हा सुरळीत झाली आहे. राज्यातील एकूण ८२ हजार ३६० संपकारी कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. तसेच बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी २८ एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. दरम्यान, राज्यातील हजारो संपकारी कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाल्यामुळे एसटी सेवा पुन्हा सुरळीत झाली असून प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, राज्यातील ९१ हजार २६६ संपकारी कर्मचाऱ्यांपैकी ८२ हजार ३६० कर्मचारी कामावर परतल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. शुक्रवारी ५ हजार ३९८ कर्मचारी कामावर हजर झाले. कामावर रुजू झालेल्यांमध्ये १० हजार बडतर्फ करण्यात आलेले कर्मचारी असून त्यांना रुजू करून घेण्याची सर्व प्रक्रिया हळूहळू पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील आठवडय़ात एसटी कर्मचाऱ्यांची संख्या आणखी वाढेल आणि एसटी सोमवारपासून पूर्ण क्षमतेने धावण्याची शक्यता असल्याचं एसटी महामंडळाने म्हटलं आहे.
गेल्या पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरु होता. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला होता. याप्रकरणी सुनावणी पार पडली असून उच्च न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले होते. तसेच कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटी देण्याचे आदेशही एसटी महामंडळाला दिले होते. त्यानुसार आज राज्यातील अनेक संपकारी कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत.
राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू झाल्यामुळे लालपरी पुन्हा रस्त्यावर धावू लागली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच आता उर्वरित एसटी कर्मचारी कामावर कधी रुजू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.