Tue. Apr 7th, 2020

जेष्ठ शास्त्रज्ञ आणि लेखक स्टीफन हॉकिंग यांचं निधन

वृत्तसंस्था, लंडन

जगप्रसिद्ध जेष्ठ शास्त्रज्ञ आणि लेखक स्टीफन हॉकिंग यांचे बुधवारी सकाळी केंब्रिजमधील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हॉकिंग यांच्या कुटुंबीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

हॉकिंग यांचा जन्म 8 जानेवारी 1942 रोजी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे झाला. 1963 मध्ये वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी मोटर न्यूरॉन या आजाराने त्यांना ग्रासलं होतं. व्हिलचेअरवर खिळलेल्या अवस्थेतही तब्बल 55 वर्ष हॉकिंग यांनी संशोधन केलं. 1959 साली त्यांनी कॉसमॉलॉजी हा विषय निवडून प्रवेश घेतला. त्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली होती. 1962 मध्ये ऑक्सफर्डमधून पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. याच विद्यापीठात त्यांनी 30 वर्षे गणिताचे अध्यापन केले. विश्वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि क्वांटम ग्रॅव्हिटी या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भात त्यांचे योगदान मोठे होते. 2009 मध्ये त्यांना प्रेसिडेन्शिअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले होते. कमांडर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर या पुरस्काराने त्यांना गौरवले होते. द ग्रँड डिझाईन, युनिव्हर्स इन नटशेल, माय ब्रीफ हिस्ट्री, द थिअरी ऑफ एव्हरीथिंग यासारखी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. विश्वाच्या उत्पत्तीच्या रहस्यांवर आधारित ‘अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’ हे पुस्तक खूप गाजले.

2001 साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या मुंबईतील विज्ञानक्षेत्रातील संशोधन संस्थेने आयोजीत केलेल्या ‘स्ट्रींग’ या परिषदेसाठी त्यांना आमंत्रित केलं होतं. त्या परिषदेत हॉकिंग यांनी दिलेलं व्याख्यान प्रसिद्ध आहे. टीआयएफआरने त्यांना सरोजिनी दामोदरन फेलोशिपही दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *