Sun. Aug 25th, 2019

अन् चक्क 10 वर्षांनी सापडला चोरीला गेलेला मोबाईल

0Shares

मुंबईत चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत, मात्र आता पोलिसांच्या सर्तकतेमुळे आणि सीसीटीव्ही कॅमेरांमुळे तेही नियंत्रणात आले आहेत. परंतू तरीही मुंबईच्या गर्दीत एखादी वस्तू हरवली किंवा चोरीला गेली तर पुन्हा मिळवणं कठीणच आहे, हा अनुभव अनेक लोकांना येतो. मात्र, चिंचपोकळीच्या आदित्यला याबाबत एक वेगळाच अनुभव आला आहे.

आदित्यने 10 वर्षांपूर्वी दिवाळीच्या एक दिवसाआधी नवा कोरा नोकियाचा 5 हजाराचा मोबाईल विकत घेतला होता. काही दिवसातच अंधेरी ते चर्चगेट लोकल प्रवासादरम्यान चोराने त्याचा मोबाईल चोरला. याबाबत आदित्यने अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

त्यानंतर त्याने अनेकवेळा पोलीस चौकीच्या फेऱ्या मारल्या तरीही त्याला मोबाईल सापडला नाही, शेवटी निराश झालेल्या आदित्यने मोबाईल शोधण्याचा विचारच सोडून दिला. पण आता चक्क 10 वर्षांनी हा हरवलेला मोबाईल आदित्यला पुन्हा मिळाला आहे.

तब्बल 10 वर्षांनी लोहमार्ग पोलीस आदित्यच्या घरी आले आणि आदित्यला कायदेशीर प्रक्रिया करून हा मोबाईल त्याच्या स्वाधीन केला. त्यामुळे हा सुखद धक्का आदित्यला बसला आहे. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे आदित्य तोंडभरून कौतुक करत आहे.

स्मार्टफोनच्या युगात हा फोन नक्कीच मागे पडलाय, अनेक नवनवीन फीचर्स, गेम आणि सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या आदित्यला आता हा फोन तितकासा उपयोगाचा नाही. पण 10 वर्षांपूर्वी घेतलेला आपला पहिला फोन ऐन दिवाळीच्या तोंडावर हरवला आणि तब्बल 10 वर्षानंतर तो परत दिवाळीतच मिळाल्यामुळे यंदाच्या या दिवाळीत यापेक्षा चांगलं गिफ्ट मला मिळूच शकत नव्हतं या शब्दात आदित्यने आपला आनंद व्यक्त केला आहे.

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *