सर्व प्रकारची कर्जवसुली तात्पुरती थांबवावी, अशोक चव्हाण यांची केंद्राकडे मागणी

कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेवर ताण येत आहे. जमावबंदी आणि संचारबंदीमुळे व्यापार, उद्योग ठप्प झाले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने RBI मार्फत वित्तिय संस्थांच्या सर्व प्रकारच्या वसुलीला सध्या काही काळ स्थगिती द्यावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
कर्जाचे हप्ते, कॅश, क्रेडिट व्याज, बिलं यांचा भरणा तात्पुरता स्थगित करण्यात यावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तसंच स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनीदेखील यासंदर्भात पत्र पाठवून केंद्र सरकारला शिफारस करावी, असं आवाहन अशोक चव्हाण यांनी केलं आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी घरात राहावं असं आवाहन सरकार करतंय. जमावबंदी आणि संचारबंदीही लागू केली गेली आहे. मात्र तरीही कर्जवसूली, EMI, इनस्टॉलमेंट्स, यांची वसूली तात्पुरती थांबवावी, अशी अशोक चव्हाण यांनी मागणी केली आहे.
आज व्यापारी, उद्योजक, चाकरमाने, कंत्राटी कर्मचारी, कामगार, शेतकरी असे सर्वच समाजघटक सध्या घरात अडकून पडले आहेत. अशा परिस्थितीत लोकांकडे पैसे कुठून असणार? अशा वेळी कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी, EMI भरण्यासाठी लोकांकडे पैसे कसे असतील? एकही हप्ता चुकला तरी CIBIL वर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे वसुलीची यंत्रणा तात्पुरती स्थगित करावी.
याशिवाय GST विवरणपत्रं आणि इन्कम टॅक्स भरायची मुदतही वाढवून द्यावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.