Mon. Jan 17th, 2022

#Nagpanchmi – नागपंचमीच्या या कहाण्या तुम्ही वाचल्या होत्या का?

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष पंचमी ‘नाग पंचमी’ म्हणून साजरी केली जाते. या दिवशी नागाची पूजा केली जाते. या प्रथेद्वारे शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या नागाप्रती आदर व्यक्त केला जातो. सुवासिनी नागाला भाऊ मानून त्याचं आदरातिथ्य करतात. नागपंचमीच्या विविध कथा प्रचलित आहेत.

कथा 1

सत्येश्वरी आणि सत्येश्वर या भावंडांची एक कथा प्रचलित आहे.

सत्येश्वर हा सत्येश्वरीचा भाऊ.

त्याचा मृत्यू नागपंचमीच्या अदल्या दिवशी झाला.

भावाच्या मृत्यूने बहीण सत्येश्वरी शोकमग्न झाली.

तिने ना अन्नग्रहण केलं, ना पाणी.

नागपंचमीच्या दिवशी सत्येश्वरीला आपला भाऊ नागरूपात दिसला.

तेव्हा तिने नागाला भाऊ मानलं.

नागदेवतेनेही सत्येश्वरीला बहीण मानलं.

त्याने आपल्या बहिणीला वचन दिलं, की जी बहीण नागपंचमीच्या दिवशी माझी पूजा करेल, मला भाऊ मानेल, तिचं मी रक्षण करेन.

 

कथा 2

एका राज्यात गरीब शेतकरी कुटुंब होतं.

या शेतकर्‍याला दोन मुले आणि एक मुलगी होती.

शेतामध्ये नांगर फिरवत असताना एका नागिणीची तीन पिल्लं फाळामुळे चिरडून मेली.

आपल्या पिल्लांच्या मृत्यूमळे नागमाता संतप्त झाली आणि तिने शेतकऱ्याचा सूड घ्यायचं ठरवलं.

एका रात्री नागीण आपल्या मुलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या शेतकर्‍याला, त्याच्या पत्नी आणि दोन्ही मुलांना डसली.

मात्र नागीण मुलीलाही डसण्यासाठी गेली होती, तेव्हा वेगळंच काही घडलं.

नागिणीला पाहून मुलीने तिला श्रद्धेने दूध पाजलं. तिची क्षमा मागितली.

नागीण तिच्यावर प्रसन्न झाली. तिच्या इच्छेवरून तिच्या कुटुंबियांना पुन्हा जिवंत केलं.

या दिवशी आता नागपंचमी साजरी केली जाते.

 

कथा 3

तक्षक नागावर संतप्त होऊन नागवंश संपवण्याच्या निर्धाराने राजा जनमेजय याने सर्पयज्ञ सुरू केला होता.

या सर्पयज्ञात सर्व सापांची अग्नीमध्ये आहुती तो देत होता.

तेव्हा नागवंश समाप्त होण्याच्या भीती तक्षक नाग देवांचा राजा इंद्राकडे गेला.

मात्र संतप्त जनमेजयाने `इंद्राय स्वाहा: तक्षकाय स्वाहा: ।’ असं म्हणत इंद्रालाही तक्षकासोबत यज्ञात ढकललं.

अखेर आस्तिक ऋषींनी तपोबलावर राजा जनमेजयाला प्रसन्न करून घेतलं आणि सर्पयज्ञ थांबवण्याचा वर मागून घेतला.

तो दिवस नागपंचमीचा दिवस होता.

आजही आस्तिक ऋषींना सर्पांचा त्राता मानून सापांपासून रक्षण व्हावं, यासाठी आस्तिक ऋषींचा धावा केला जातो.

अनेक गावागावांत आजही रात्री झोपण्यापूर्वी

‘आस्तिक आस्तिक आस्तिक

ऋषीची आण

कोदंडपाणि

कफल्लक कफल्लक कफल्लक’

असं म्हटलं जातं. असं म्हटल्याने रात्री साप येऊन चावत नाही अशी श्रद्धा आहे.

 

कथा 4

श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहात असणाऱ्या कालिया नागाशी लढाई केल्याचं भागवतात वर्णन आहे.

कालिया मर्दनाचा दिवस दिवस श्रावण शुद्ध पंचमी होता.

तेव्हापासून नागपंचमी साजरी केल्याचं मानलं जातं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *