Sun. Oct 24th, 2021

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मंदिरावर हल्ला

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एका मंदिरावर काल हल्ला करून जमावाने मंदिरातील मूर्तींची मोडतोड केली, तसेच मंदिराचा काही भाग जाळून टाकला. मुख्य न्यायाधीश गुलझार अहमद यांनी या हल्ल्याबाबत तीव्र चिंता व्यक्त व्यक्त केली असून, हे प्रकरण न्यायालयापुढे सुनावणीसाठी ठेवले जाणार आहे. तर, या घटनेबाबत आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील कारवाईचे आदेश दिले आहेत.

पंतप्रधान इम्रान खान यांनी या संदर्भात केलेल्या ट्विमध्ये म्हटले आहे की, ”मी रहीम यार खानच्या भोंगमधील गणेश मंदिरावर काल झालेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करतो आहे. मी अगोदरच पंजाबच्या आयजी यांना सर्व आरोपींना अटक होईल याची खबरदारी घेण्यास आणि पोलिसांच्या कोणत्याही बेजबादार वागणुकीबद्दल कारवाई करण्यास सांगितलं आहे. सरकार मंदिराचा जीर्णोद्धा देखील करेल.”

 

लाहोरपासून ५९० किलोमीटरवर असलेल्या रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरातील गणेश मंदिरावर जमावाने बुधवारी हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्लेखोरांजवळ काठ्या, दगड आणि विटा होत्या. त्यांनी धार्मिक घोषणा देत मूर्तींची मोडतोड केली, तसेच मंदिराचा काही भाग जाळला, असे पोलिसांनी सांगितले.

भारताने गुरुवारी नवी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासाच्या प्रमुखांना पाचारण केले आणि पंजाब प्रांतातील हिंदू मंदिराची नासधूस करण्याच्या ‘निंदनीय घटनेबद्दल’ निषेध नोंदवला. पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर हिंसाचार आणि त्यांच्या धार्मिक छळाच्या घटना अखंडित सुरूच आहेत, असे भारताने लक्षात आणून दिले.

भारताकडून तीव्र निषेध

पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदायांच्या धार्मिक स्वातंत्र्यावरील आणि त्यांच्या पूजास्थळांवर भयावह प्रमाणात हल्ले होत असताना तेथील सरकार आणि सुरक्षा यंत्रणा मूक दर्शक बनल्या आहेत, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *