महापोर्टल बंद करण्याची खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

मुंबई : महापोर्टल बंद करण्यात यावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. महापोर्टल बंद करण्यासंदर्भात सुप्रिया सुळेंनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तसेच सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना याबाबत लेखी निवेदनही दिले.
निवेदनात काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
संवाद दौऱ्यानिमित्त राज्यातील अनेक तरुणांशी माझा संवाद होत असतो. तरुण माझ्यासमोर त्यांच्या अडचणी मांडत असतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी राज्यात मोठ्या प्रमाणावर आहेत.
प्रशासकीय सेवेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पोर्टल मदत कमी अडचणीचे जास्त ठरत आहे. महापोर्टल बंद करुन परीक्षा पूर्वीप्रमाणे घेण्यात यावी, अशी विनंती सुप्रिया सुळेंनी आपल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
फडणवीस सरकारच्या काळात शासकीय नोकरभरतीसाठी महापोर्टल सुरु करण्यात आले होते. पण या महापोर्टल विरुद्ध अनेक तक्रारी आहेत. महापोर्टल विरोधात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली होती.