Thu. Apr 18th, 2019

‘हे’ आहे हरमनप्रीतच्या ‘त्या’ दमदार षटकारांमागचं रहस्य!

0Shares

कॅप्टन हरमनप्रीत कौरचे तडाखेबंद शतक आणि जेमिमाह रॉड्रीग्जच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने महिलांच्या टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या लढतीत न्यूझीलंडवर 34 धावांनी विजय मिळवला. प्रॉव्हिडन्स स्टेडियममध्ये झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 194 धावांपर्यंत मजल मारली. त्यात हरमनप्रीत कौरने 51 चेंडूंत 7 चौकार आणि 8 षटकारांसह 103 धावांची धडाकेबाज खेळी केली. आपल्या दमदार खेळीमुळे टी-20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.

मात्र हा तडाखेबंद खेळ करण्यामागचं कारण मात्र वेगळंच आहे. हरमनप्रीतचे पोटाचे स्नायू अखडले होते. अशा परिस्थितीतही तिने दमदार खेळी केली. याचं जे कारण तिने सांगितलंय, ते वाचून तुम्हालाही तिचं कौतूक वाटेल. पोटाच्या स्नायूंना त्रास होत असताना हरमनप्रीतला बाद होऊन ड्रेसिंग रूममध्ये जाणं शक्य होतं. मात्र तिने तो पर्याय न निवडता खेळण्याचा पर्याय स्वीकारला. मात्र मैदानावर खेळताना सतत धावणं तिला अशक्य वाटत होतं. यावर उपाय म्हणून तिने 8 धडाकेबाज षटकार ठोकले, जेणेकरून आपली धावपळ वाचेल.

हरमनप्रीतचा खेळ तर दमदार होताच, मात्र त्यासाठी आपल्या दुखापतीकडे दुर्लक्ष करून उलट त्यावर आपल्या खेळातूनच मार्ग काढणाऱ्या हरमनप्रीतचा निश्चितच अभिमान वाटेल. हरमनप्रीतच्या याच जिद्दीमुळे भारताने दणदणीत विजय मिळवलाय.

भारताला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडने आश्वासक सुरुवात केली. पण, पूनम यादव, हेमलता आणि राधा यादव यांच्या अचूक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडला निर्धारित 20 षटकांत 9 बाद 160 धावांपर्यंतच मजल मारता आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *