Tue. Mar 31st, 2020

‘मन फकिरा’ मधून सुव्रत जोशी आणि सायली संजीव प्रथमच एकत्र

लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिचं दिग्दर्शन असलेला आणि आजच्या आघाडीच्या लोकप्रिय कलाकारांनी साकारलेला ‘मन फकीरा’ हा मराठी चित्रपट 6 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या गाजलेल्या मराठी मालिकेतून नावारूपाला आलेला अभिनेता सुव्रत जोशी आणि ‘काहे दिया परदेस’ मालिकेमधून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री सायली संजीव ‘मन फकीरा’ चित्रपटामधून पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत.

सुव्रत जोशीने यापूर्वी ‘शिकारी’, ‘पार्टी’ आणि ‘डोक्याला शॉट’ या सिनेमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्याचबरोबर ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका त्याची विशेष गाजली होती. ‘अमर फोटो स्टूडीओ’ या नाटकातूनही सुव्रत मनोरंजन करत आहे.

तर अनेक मालिका, सिनेमा आणि नाटकांतून काम करणारी अभिनेत्री सायली संजीव हिची झी मराठी वरील ‘काहे दिया परदेस’ ही तिची मालिका विशेष गाजली. ‘काहे दिया परदेस’ मालिकेत काम करण्यासोबतच तिने ‘पोलिस लाइन’, ‘आटपाडी नाईट्स’ तसेच ‘सातारचा सलमान’ या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत.

सुव्रत आणि सायली सांगतात, ‘आम्ही ‘मन फकीरा’ सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. आम्हांला भूषण आणि रिया ही भूमिका साकारताना खूप मज्जा आली. एकमेकांबरोबर काम करण्याचा अविस्मरणीय असा अनुभव होता. आमची या चित्रपटासाठी निवड केल्याबद्दल दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे हिचे आम्ही खूप खूप आभार मानतो. तिने या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन खूप उत्तमरीत्या केले आहे आणि हा चित्रपट प्रेक्षकांना देखील आवडेल असा आम्हांला विश्वास आहे.’

‘मन फकीरा’ या रोमँटिक ड्रामाच्या प्रदर्शित झालेल्या पोस्टर, टीझर आणि गाण्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर सिनेमाच्या ट्रेलरला देखील सोशल मीडियावर १ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *