Wed. Nov 13th, 2019

स्वामी विवेकानंद यांच्याबद्दलच्या विलक्षण गोष्टी जाणून घ्या…

नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्तनरेंद्रनाथ म्हणजेच स्वामी विवेकानंद.यांची आज 117 वी पुण्यतिथी आहे.

नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्तनरेंद्रनाथ म्हणजेच स्वामी विवेकानंद यांची आज 117 वी पुण्यतिथी आहे.उत्तर कलकत्त्यातील सिमलापल्ली येथे 12 जानेवारी 1863 साली त्यांचा जन्म झाला. त्यांनी 4 जुलै 1902 ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. त्यांनी आपल्या  वक्तृत्वाद्वारे आणि विविध विषयांच्या सखोल अभ्यासाद्वारे साऱ्या जगाचे लक्ष वेधले. तल्लख बुद्धीच्या स्वामींनी जगाला खरे अध्यात्म समजावून सांगितले.

स्वामी विवेकानंदांसंदर्भातील विलक्षण गोष्टी!

नरेंद्र दत्त असं मूळ नाव असलेले स्वामी विवेकानंद मुळात नास्तिक होते. मात्र रामकृष्ण परमहंस यांच्या सानिध्यात त्यांना ईश्वराचं ज्ञान मिळालं.

विवेकानंद हे जरी आध्यात्मिक वृत्तीचे संन्यासी असले, तरी जगापासून स्वतःला अलिप्त ठेवून दूर हिमालयात ध्यानधारणा करत मोक्ष मिळवणं हे त्यांचं ध्येय नाही, असं त्यांच्या गुरूंनीच त्यांना समजावलं. त्यामुळेच संपूर्ण देशभरात लोकांमध्ये मिसळत, त्यांच्या समस्या जाणून घेत, त्यांना मार्गदर्शन करत स्वामी आपलं इतिकर्तव्य पार पाडत राहिले.

कन्याकुमारी येथील समुद्रातील भव्य शिळेवर त्यांना साक्षात्कार झाला आणि आपल्या धर्माची आणि भारतीय संस्कृतीची महती संपूर्ण जगाला समजवावी यासाठी त्यांनी अमेरिकेच्या सर्वधर्म परिषदेत प्रवेश मिळवला.

या परिषदेतील स्वामी विवेकानंद यांचे ‘माझ्या अमेरिकन बंधू भगिनींनो’ हे उद्गार विलक्षण गाजले. तोपर्यंत मंचावर प्रेक्षकांना संबोधित करणारे सर्व धर्मांचे उमेदवार ‘लेडिज अँड जंटलमेन’ याच शब्दांत लोकांना संबोधित करत होते. स्वामीजींच्या उद्गारांनी मात्र सभागृह भारावून गेलं.

जगभरात स्वामीजींनी अनेक व्याख्यानं देत हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीचं महत्त्व जगाला पटवून दिलं. भारत देश हा मागासलेला देश नसल्याचं दाखवून दिलं. तसंच हिंदू धर्मातील रूढी-परंपरांवर घणाघात करत धर्माला अधिकाधिक लोकाभिमुख केलं.

स्वामीजींकडे जेव्हा गोरक्षक संस्थेचे लोक वर्गणीसंदर्भात बोलणी करायला आले, तेव्हा आधी माणसाला माणूस म्हणून नीट वागवा, त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करा, असा संदेश स्वामीजींनी त्यांना दिला.

जेव्हा त्यांच्याकडे एक तरूण आपण आपल्या घराच्या दारं, खिडक्या बंद करून, पूर्णपणे अंधार करून साधना करायचा प्रयत्न करतो, मात्र चित्त शांत होत नाही, अशी तक्रार घेऊन आला; तेव्हा स्वामीजींनी त्याला आधी दारं खिडक्या उघडून जगाकडे बघायचा संदेश दिला. लोकांमध्ये जाऊन त्यांच्यात मिसळ, त्यांची दुःख दूर कर, हिच खरी साधना असा कानमंत्र दिला.

लहान मुलांना तर ते घरात बसून भगवद्गगीता वाचण्यापेक्षा मैदानात जाऊन फूटबॉल खेळा असं सांगत. त्यांचे हे विचार पारंपरिक संन्याश्यांच्या विचारांपेक्षा पूर्णतः वेगळे होते.

जगभरात मानवतेचा संदेश देणारे स्वामी विवेकानंद जेव्हा भारतात परतत होते, तेव्हा मातृभूमी पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. त्यावेळी एका विदेशी सहप्रवाश्याने त्यांना प्रश्न केला, की संन्यासी म्हणजे मोह दूर सारणारे, मानवतेचं चिंतन करणारे, मग तुम्ही अजूनही भारताच्या अजून इतके प्रेमात कसे?… यावर स्वामीजींने उत्तर दिलं, की जी व्यक्ती स्वतःच्या मातृभूमीवर प्रेम करू शकत नाही, ती विश्वाला कसं कवेत घेणार? आपल्याच देशबांधवांबद्दल ममत्व नसेल, तर साता समुद्रापारच्या असंख्य अपरिचित लोकांबद्दल माया कशी निर्माण होणार?

स्वामी विवेकानंदांचा विचार

‘उत्तिष्ठ, जाग्रत:, प्राप्यवरानिबोधत:’ असा गीतेतला संदेश ते नेहमी देत. याचाच अर्थ ‘उठा, जागे व्हा, आणि ध्येयपूर्ती होईपर्यंत थांबू नका’.

दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे.

व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.

आपल्याला अनंत शक्ती, उत्साह, साहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून कार्ये होतील.

दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा. तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.

स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वत:ला दुर्बळ समजलात तर दुर्बळ बनाल आणि सामर्थ्यशाली समजलात तर सामर्थ्यशाली बनाल..

संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे राहिले, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामध्ये असलं पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *