Sat. Apr 17th, 2021

‘दुनियादारी’नंतर पुन्हा स्वप्निल जोशी आणि ‘सुशि’ कॉम्बिनेशन

सिरीयल, सिनेमांनंतर आता मराठी स्टार स्वप्निल जोशी प्रथमच वेबसिरिजमध्ये झळकत आहे. ‘समांतर’ या वेबसिरिजमधून स्वप्निल जोशी एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांपुढे येत आहे. दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी या वेबसिरिजचं दिग्दर्शन केलं आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई’ या सिरीजमधील सर्वंच सिनेमांचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं होतं. त्यामुळे सतीश राजवाडे आणि स्वप्निल जोशी पुन्हा या वेबसिरिजमध्ये एकत्र येत आहेत. तसंच ‘तू ही रे’ सिनेमात दिसलेली स्वप्निलची तेजस्विनी पंडीतसोबतची जोडी पुन्हा या वेबसिरिजमधून पाहायला मिळत आहे. मात्र याशिवाय आणखी एक कॉम्बिनेशन या वेबसिरिजमध्ये पुन्हा पाहायला मिळत आहे. हे कॉम्बिनेशन म्हणजे स्वप्निल जोशी आणि दिवंगत लेखक सुहास शिरवाळकर अर्थात वाचकांचे लाडके ‘सुशि’ यांचं.

मराठी साहित्यातले वाचकप्रिय कादंबरीकार सुहास शिरवाळकर यांच्या ‘दुनियादारी’ या अतोनात गाजलेल्या कादंबरीवर आधारीत ‘दुनियादारी’ हा सिनेमा सुपरहिट झाला होता. या सिनेमातील स्वप्निलची ‘श्रेयस’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावली होती. ‘समांतर’ ही वेबसिरिजदेखील सुहास शिरवाळकर यांच्या ‘समान’ या कादंबरीवर आधारित आहे.

“वेब सिरीजमध्ये पहिले पाऊल टाकताना कथानकाची निवड माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. समांतर ही मला आवडणाऱ्या कादंबऱ्यांपैकी एक असून तिचे लिखाण सुहास शिरवळकर यांनी केले आहे. काही वर्षापूर्वी शिरवळकर यांच्या साहित्यावर आधारित दुनियादारी’मध्ये माझी प्रमुख भूमिका होती. ते माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक आहेत. ते धाडसी लेखक आहेत. समांतर एक अत्यंत चांगली दृश्य कलाकृती ठरणार आहे. मी समांतरचा भाग असल्याचा तसेच मला शिरवळकर यांच्या नावासोबत जोडण्याची संधी लाभली म्हणून आनंद वाटतो. दुनियादारीनंतरची ही दुसरी संधी आहे. मी श्रीमती शिरवळकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांचे आभार मानतो की, त्यांनी आम्हाला- मला, सतीश राजवाडे आणि ‘जीसिम्स’ला हा प्रकल्प करण्याची संधी दिली. त्यांनी मोठ्या विश्वासाने आमच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली.”

‘समांतर’ ही वेब सिरीज ‘जीसिम्स’ (ग्लोबल स्पोर्ट्स एन्टरटेनमेंट अँड मीडिया सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड)च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांची निर्मिती असून अनेक भाषांमध्ये यशस्वी सिनेमे देणाऱ्या या कंपनीची पहिली मराठी वेबसिरीज आहे. ‘मोगरा फुलला’, ‘फुगे’, ‘तुला कळणार नाही’, ‘रणांगण’, ‘विकी वेलिंगकर’ अशा सिनेमांची निर्मिती आजवर या कंपनीने केली आहे. ‘समांतर’ ही वेबसिरीज ‘MX Player’ वर पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *