तामिळ अभिनेते विवेक यांचं निधन

तामिळ चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारणारे अभिनेते विवेक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. विवेक यांनी जवळपास २०० सिनेमांमध्ये काम केले होते. चेन्नई येथील हॉस्पिटलमध्ये वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

विवेक शुक्रवारी सकाळी घरातच बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना तातडीने चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच शनिवारी पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

विवेक यांनी १५ एप्रिलला कोरोनाची पहिली लस घेतली होती. यासंबंधीची माहिती त्यांनी माध्यमांना दिली होती. ‘कोरोनाची लस घेणं सुरक्षित आहे. ही लस घेतली म्हणजे आपण आजारी होणार नाही असे समजू नका. आपल्याला काळजी घ्यावीच लागणार आहे. फक्त लस घेतल्याने कोरोनाचा धोका कमी झालाय इतकेच’, असं विवेक त्यावेळी म्हणाले होते.

विवेक यांनी चित्रपटसृष्टीत रजनीकांत, कमल हासन, अजित, विजय, माधवन आणि विक्रम संग यांच्यासोबत काम केले होते. माधवनसोबत केलेल्या ‘रन’ सिनेमाने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती. विवेक यांना सिनेमातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.

दरम्यान, विवेक यांच्या निधनाच्या बातमीनंतर तामिळ चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी, राजकारणी नेत्यांनी तसेच त्यांच्या अनेक चाहत्यांनी विवेक यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे.

Exit mobile version