कोरोनामुळे आईवडील गमावलेल्या बालकांसाठी टास्क फोर्स सज्ज

नागपूर: नागपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पालकांचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या बालकांच्या जीवनावरही गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे कोरोनामुळे आईवडील गमावलेल्या बालकांच्या काळजी अणि संरक्षणासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे.

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची संपूर्ण जबाबदारी या कृती दलामार्फत घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-१९ च्या साथीच्या पार्श्वभूमीवर अशा बालकांची काळजी आणि संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

अशा बालकांबाबत प्रशासनाला तात्काळ कळविण्याचे आवाहन करताना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे म्हणाले की, अशा बालकांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी जिल्हा कृती दलामार्फत घेण्यात येणार आहे. अशा निराधार बालकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे.

Exit mobile version