Sun. Jun 13th, 2021

विकृतीचा कळस ! शिक्षिकेने चिमुकलीला काढले चिमटे

राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण होण्याच्या अनेक घटना समोर येतात. दरम्यान कल्याणमधील प्री-स्कुलच्या शिक्षिकेनं चिमुकल्या विद्यार्थिनीच्या हातावर विकृतपणे चिमटे काढल्याची घटना समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

नोकरदार आईवडील कामावर जाताना आपल्या मुलांना दिवसभर सांभाळण्यासाठी डे केअर सेंटरमध्ये सोडून जातात. तिथे मुलांना दिवसभर सांभाळण्यासोबतच शिकवलंही जातं.

कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा वसंत व्हॅली परिसरात अशीच लर्निंग कर्व्ह नावाची संस्था आहे. या संस्थेत दीपक माखीजा आणि वृत्ती माखीजा हे चार्टर्ड अकाउंटंट दाम्पत्य त्यांच्या तीन वर्षीय मुलीला दिवसभर सोडून जात होते.

मात्र १२ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मुलीने प्री-स्कुलमधून परत जाताना आपल्याला टिचरने मारल्याचं आईला सांगितलं. तिच्या हातावर नखं लागल्याच्या खुणा होत्या.

त्यामुळे वृत्ती माखीजा यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यानंतर शाळेचं सीसीटीव्ही फुटेज पाहिलं असता त्यात खुशबू नावाची शिक्षिका या मुलीला चिमटे काढताना स्पष्टपणे कैद झाल्याचं त्यांना आढळलं.

तर दुसरीकडे लर्निंग कर्व्ह संस्थेचे क्लस्टर हेड निनाद मुंडे यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळत यात आपल्या शिक्षिकेची काहीच चूक नसल्याचं सांगितलं.

धक्कादायक बाब म्हणजे या घटनेला आता महिना होत आला असला, तरी पोलिसांनी गुन्हा नोंदवण्या पलीकडे काहीही कारवाई केलेली नाही. याशिवाय कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी याबाबत कॅमेरासमोर बोलायलाही नकार दिला आहे.

इतक्या छोट्या प्रकरणात मी प्रतिक्रिया देणार नसल्याचं सांगितल्यानं आता पोलिसांच्या हेतुवरच शंका उपस्थित झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्री-स्कुल प्रशासना विरोधात कारवाई करण्याची मागणी वृत्ती माखीजा यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *