घर बळकविण्यासाठी मालकाची गळा चिरून निर्घृण हत्या

घर बळकविण्यासाठी मालकाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्याची घटना घडली असून भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी भाडेकरूसह त्रिकुटास गजाआड केलं आहे. घर मालकाने भाडेकरूला घरातून बाहेर काढल्याच्या रागातून घर बळकवण्यासाठी त्या भाडेकरूने 2 साथीदाराशी संगमत करून घर मालकाची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील कासमी कंपाऊंड परिसरातील एका यंत्रमाग कारखान्याच्या समोर घडली आहे.
याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करीत भोईवाडा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास करून काही तासातच त्रिकुटाला गजाआड केले आहे. रमेश राठोड (वय 28), संजयकुमार हिरजन (वय, 25), संजय पवार (वय, ३५) असे खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.
तुळशीराम चव्हाण (वय, ३१) असे निर्घृण हत्या झालेल्या घर मालकाचे नाव आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास भोईवाडा पोलीस करीत आहेत.