‘मुख्यमंत्री राहायचं की, नाही ते ठाकरेंनी ठरवावे’

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघडी सरकारवर मोठं संकट कोसळलं आहे. कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड पुकारला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. दरम्यान, हिंदुत्वापेक्षा मुख्यमंत्रीपद मोठे नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी निकटवर्तीयांकडे दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार असल्याचे आव्हान ठाकरे यांनी दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आव्हानानंतर एकनाथ शिंदे यांनीही प्रतिआव्हान दिले आहे. मुख्यमंत्री राहायचं की, नाही ते ठाकरेंनी ठरवावे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
‘शिवसैनिक म्हणाला तर पक्षप्रमुख पदही सोडेन’
स्वकीयांचे वार जास्त वेदनादायी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. बंडखोरांपैकी एकानेही मला समोर येऊन सांगावं, मी मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार आहे. माझा राजीनामा तयार आहे. शिवसैनिक म्हणाला तर पक्षप्रमुख पदही सोडेन, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री पद सोडण्याचे मी नाटक करत नाहीए, मात्र माझ्यानंतर मुख्यमंत्री शिवसैनिकच असला पाहिजे, असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
एकनाथ शिंदेंच्या तीन अटी कुठल्या?
काँग्रेस,राष्ट्रवादीसोबत सरकार नको
हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपासोबत सरकार बनवा
गटनेतेपदी मीच असणार
‘हिंदुत्व आणि शिवसेना वेगळे होऊ शकत नाही’
शिवसेनाप्रमुखांनी शब्द दिला आहे की हिंदुत्व आमचा श्वास आहे. आणि त्यांचाच विचार मी पुढे नेत आहे. तसेच विधानभवनात हिंदुत्वाबद्दल बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं नसून हिंदुत्व आणि शिवसेना वेगळे होऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.