Jaimaharashtra news

ठाण्यात कोरोनाचे नियम धाब्यावर

ठाणे: राज्य सरकारच्या ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत टाळेबंदीची सुरुवात झाली असून कडक अंमलबजावणी सुरू असली,तरी ठाण्यातील सॅटिस पूल येथील चित्र काहीसे वेगळे पाहायला मिळत आहे. ठाणे रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या सॅटिस पुलावर आज सकाळी प्रवाशांची टीएमटी बसने प्रवास करण्यासाठी गर्दी दिसून आली. यावेळी सामाजिक अंतर पाळणे किंवा नागरिकांचे ओळखपत्र तपासत असताना प्रशासन दिसून आले नाही.

राज्य सरकारच्या नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवेमधील नागरिकांना फक्त प्रवास करण्याची मुभाही देण्यात आलेली आहे. अत्यावश्यक सेवेतील नसलेली व्यक्तीदेखील ठाण्यात प्रवास करत असल्याचे दिसून आले. राज्य सरकारने सर्वच परिवहन सेवांना फक्त पन्नास टक्के क्षमतेने प्रवाशांना प्रवास चालू ठेवण्याची परवानगी दिली असूनदेखील बसमध्ये ही गर्दी पाहायला मिळाली. येथील कंडक्टर आणि बस चालक यांना विचारले असता आम्हाला कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र तपासण्याचे आदेश आलेले नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. यातून ठाणे महानगरपालिकेचा हलगर्जीपणा पाहायला मिळाला आहे.ही परिस्थिती अशीच राहिल्यास नियमांचे काटेकोर पद्धतीने पालन न करणाऱ्या, तसेच विनाकारण फिरणाऱ्या प्रवाशांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

संपादन – सिद्धी भरत पाटील

Exit mobile version