Sat. Nov 27th, 2021

ठाणे महापालिकेचे नवे परिपत्रक जाहीर

 

राज्य सरकारने बुधवारपासून टाळेबंदी लागू केली असून यामध्ये खाद्यपदार्थ फेरीवाले तसेच अत्यावश्यक सेवेतील विक्रेत्यांना मुभा दिली असली, तरीही मागील अनुभव लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने नवी नियमावली प्रसारित केली आहे.या नियमावलीत दाट लोकवस्तीच्या ठिकाणी अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आहेत का, तसेच दुकानांमध्ये गर्दी होते का, याचा अभ्यास करून साहाय्यक आयुक्त येथील दुकानांना वेळा ठरवून देणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच घरकाम करणाऱ्या महिला, वाहनचालक, वैयक्तिक निगारक्षक यांची सेवा सुरू राहणार असल्याचेही ठाणे महापालिकेने परिपत्रकात म्हटले आहे.

राज्य सरकारने बुधवार रात्री ८ पासून टाळेबंदी घोषित केली आहे. टाळेबंदीच्या आदेशामध्ये अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवणे तसेच रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना खाद्य पदार्थाची पार्सल सेवा देता येणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, मागील टाळेबंदीमध्ये रस्त्यावरील भाजीपाला विक्रेत्यांमुळे ठाणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे महापालिकेने कोरोना नियमावलीचे नवे परिपत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील भाजीपाला, डेअरी, खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने दाट वस्तीच्या ठिकाणी आहेत का, किंवा दुकानांमध्ये गर्दी होते आहे का, याबद्दलचा सर्व अभ्यास साहाय्यक आयुक्त करणार आहेत. त्यानुसार दुकानांच्या वेळा बदलणे किंवा दुकानांच्या वेळा निर्धारित करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

घरकाम करणाऱ्या महिला, वाहनचालक, वैयक्तिक निगारक्षक, घरगुती कामगार या क्षेत्रातील कामगारांना सुरू ठेवायचे की नाही, याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारने महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार घरकाम करणाऱ्या महिला, वाहनचालक, वैयक्तिक निगारक्षक, घरगुती कामगारांच्या सेवा सुरू ठेवण्यास महापालिकेने मुभा दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *