Sun. Sep 19th, 2021

ठाण्यात मीरा चोप्रा पाठोपाठ सौम्या टंडनचेही लसीकरणासाठी बनावट ओळखपत्र

ठाणे: अभिनेत्री मीरा चोप्राच्या पाठोपाठ आता अभिनेत्री सौम्या टंडननेही कोरोना लस घेण्यासाठी बोगस ओळखपत्र बनवले, अशी माहिती समोर आली आहे.

अभिनेत्री सौम्या टंडननेही लसीकरण करुन घेण्यासाठी बनावट ओळखपत्र तयार करुन घेतल्याचा दावा केला जात आहे. ठाणे महापालिकेच्या चौकशी अहवालात अभिनेत्री सौम्या टंडनचे नाव समोर आले आहे. आतापर्यंत २१ बनावट ओळखपत्रे तयार करुन १५ जणांचे बेकायदेशीर लसीकरण झाल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेत्री सौम्या टंडनने ‘ऐसा देस है मेरा’, ‘जब वि मेट’ या गाजलेल्या सिनेमात तिने काम केलं. ‘भाभी जी घर पे है’ या मालिकेतील अनिता भाभीच्या व्यक्तिरेखेमुळे सौम्या लोकप्रिय झाली.

ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील कोव्हिड सेंटरमध्ये सुपरवायझर असल्याचे भासवून अभिनेत्री मीरा चोप्रा हिने लसीकरण करुन घेतल्याचं गेल्या आठवड्यात उघडकीस आलं होतं. राज्यात लसीचा तुटवडा जाणवत असताना ४५ वर्षांवरील नागरिकांना आधी लस मिळावी, यासाठी अनेक ठिकाणी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण पुढे ढकलण्यात आलं आहे. मात्र बनावट ओळखपत्र बनवून अभिनेत्रींनी स्वतःचे लसीकरण केल्याने सोशल मीडियावर संतापाची लाट उमटली आहे. या प्रकरणी ठाणे महानगपालिकेकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *