नाशिकमध्ये शाळा सुरू होण्याचा निर्णय पुढे ढकलला

दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नवा व्हेरिएंटमुळे जगभरात चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शाळा सुरू करण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.
नाशिक महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्याचा निर्णय १० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आज शिक्षण प्रशासन अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेच्या विभागप्रमुखांच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी याबाबतच्या सूचना केल्या आहेत. कोरोनाच्या नवे व्हेरिएंट ओमिक्रॉनचे चित्र पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
शालेय मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्यात यावे याबाबत प्रस्ताव मांडला होता. तसेच राज्यातील पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाची कोणतीही अडचण नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे आता पहिली ते चौथीचे वर्ग ऑफलाईन सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे.