‘मास्क वापरण्याचा निर्णय ऐच्छिक’ – राजेश टोपे

कोरोनामुळे राज्यात लागू केलेले निर्बंध पूर्णत: हटवण्यात आले आहेत. गुढीपाडव्याच्या शुभमुर्हुतावर महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त होणार असल्याचा निर्णय राज्य स्तरावर घेण्यात आला आहे. महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मास्कबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोना निर्बंधांप्रमाणेच नागरिकांनी मास्क वापरण्याची सक्ती मागे घेण्यात आली आहे. तसेच मास्कचा वापर करण्याचा निर्णय ऐच्छिक असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
राज्यसरकारकडून मास्कमुक्तीची घोषणा करण्यात आली असली तरी मास्क वापरायचा की नाही हा निर्णय ऐच्छिक असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. ज्या नागरिकांना मास्क वापरायचा आहे त्यांनी मास्कचा वापर करावा. तुमच्या सुरक्षेसाठी मास्कचा वापर करण्याचे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.
आज पार पडलेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. राज्य सरकारने मास्कमुक्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे तब्बल ७३६ दिवसांनी नागरिकांची मास्क वापरण्यापासून सुटका झाली आहे. तसेच, गुढीपाडव्याला महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध हटवल्यामुळे गुढीपाडव्याच्या मिरवणुका, शोभायात्रा काढता येणार आहेत. तर, रमजानच्या मिरवणुकासुद्धा काढता येणार आहेत.