Tue. Aug 9th, 2022

शिंदे गटाची पहिली पत्रकार परिषद

शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला आहे. तसेच शिवसेना आणि अपक्ष आमदार मिळून ५५ आमदार शिंदेंच्या बंडात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेत मोठं खिंडार पडलं असून महाविकास आघाडी सरकारवर मोठं संकट कोसळलं आहे. दरम्यान, शनिवारी एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची बैठक पार पडली. शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी बैठकीत भाष्य केले. तसेच शिंदे गटाच्या पुढील वाटचालीबाबत सांगितले. आमच्या गटाचे नेते एकनाथ शिंदे हेच असून आमच्याकडे शिवसेनेचे दोन तृतीयांश बहुमत असल्याचे केसरकर म्हणाले आहेत.

आजही आम्ही शिवसेनेतच असल्याचे दीपक केसरकर म्हणाले आहेत. संवाद नसला की मोठे गैरसमज निर्माण होतात. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो, त्यामुळे आम्ही शिवसेनेतून माघार घेतली, असा गैरसमज झाला. मात्र आम्ही आजही शिवसेनेचे सदस्य असल्याचे दीपक केसरकर म्हणाले.

कुणाच्याही दबावाखाली आमचा बंड नसून आम्ही गटनेता निवड, १६ आमदारांना नोटीस यासंदर्भात उपाध्यक्षांच्या निर्णयाला आम्ही न्यायालयात आव्हान देणार असल्याचे दीपक केसरकर म्हणाले. व्हिप हा सभागृहात बजावला जातो. आम्ही ५६ आमदार होते, आता ५५ आहोत. त्यामुळे १६ जण एकत्र येऊन गटनेते निवडू शकत नाही. त्यामुळे आम्ही याप्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचे केसरकर म्हणाले.

तसेच, आम्ही बंड पुकारल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. मोठ्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून शिवसैनिकांनी तोडफोड बंद करून त्यांनी कायद्याचे पालन करावे, असे आव्हान केसरकर यांनी केले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कायदा सुव्यवस्था पाळावी असेही केसरकर म्हणाले. तर, राज्यातील वातावरण बदलल्यावर महाराष्ट्रात येणार असल्याचेही केसरकर म्हणाले.

दीपक केसरकर यांनी बैठकीत खातेवाटपाबाबतही भाष्य केलं. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुखांनी चांगली खाती राष्ट्रवादी आणि काँग्रेसला दिली आहेत. मात्र, शिवसेनेकडे त्यांनी दुर्लक्ष केले. पक्षप्रमुख आमचे ऐकतील अशी अपेक्षा होती, मात्र त्यांनी आमच्या मागण्या आमचे बोलणे ऐकले नाही, असा घणाघातही दीपक केसरकर यांनी केला आहे. तर, मुख्यमंत्री, पंतप्रधान एका दिशेने जातात तेव्हाच राज्याचा विकास होतो, असे दीपक केसरकर म्हणाले. दरम्यान, दीपक केसरकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत हे आग लावण्याचे काम करतात, असा आरोप केसरकर यांनी केला आहे.

दीपक केसरकर यांनी ईडी कारवाईवरही भाष्य केलं आहे. ईडीची कारवाई सगळ्यांवर नाही तर आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या एका दोघांवर झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की ते आमचा विचार करायचे. मात्र, आम्हाला पक्षप्रमुख आमचे ऐकतील अशी अपेक्षा होती, असेही केसरकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.