Tue. Nov 30th, 2021

कारने येऊन ‘हे’ चोरी करायची टोळी, चोरी बघुन पोलिसांच्या उंचावल्या भुवया

रात्रीच्या किर्रर्र अंधारात एक टोळी आलिशान कारने येते. नागपूरच्या गल्ली बोळात फिरते. या टोळीने नागपूरमध्ये उच्छाद मांडला आहे. यामुळे पोलिस यांच्या मार्गावर होते. मात्र तीन महिन्याच्या अथक परिश्रमानंतर नागपूर पोलिसांनी शेव्हर्ले, होंडा सिटी सारख्या मोठ्या कारने येऊन चोरी करणाऱ्या एका अनोख्या टोळीला अटक केली आहे.

ही टोळी करते तरी काय ?

पहाटे तीन वाजून सत्तावीस मिनिटांवर अंधारात गल्लीतच्या कोपऱ्यावर येऊन एक अलिशान कार उलट्या दिशेने गल्लीत शिरते. त्यातून अत्यंत सावध पद्धतीने त्याच्यातून एक एक करून तीन युवक उतरतात. या युवकांना पाहून कदाचित तुम्हाला वाटेल की अत्यंत आवश्यक कामासाठीच हे युवक पहाटे साडे तीन वाजता असे बाहेर फिरत असावेत.

मात्र हिवाळ्यात रात्रीच्या थंडीत फिरणारे हे युवक साधे नव्हे तर सराईत चोर आहेत. त्यांच्या चोरीच्या पद्धतीने गेले तीन महिने नागपूर पोलिसांच्या डोक्याला चांगलाच ताप दिला आहे.

हे चोर दिवसा दुचाकीने फिरून कोणत्या ठिकाणी गोपालक त्यांच्या गायी बांधतात. तिथे संध्याकाळ नंतर किती वर्दळ असते. याचा अंदाज घेतात आणि त्यानंतर पहाटेच्या सुमारास कारने येऊन गाय, त्यांचे वासरे चोरतात.

चोरलेले गोवंश पळवण्यासाठी ही टोळी कारच्या मागील बाजूची सीट काढून तिथे गाईंना क्रूर पद्धतीने कोंबतात आणि त्यानंतर तीव्र गतीने ही कार गुप्त ठिकाणी निघून जाते. 

या टोळीने गेल्या तीन महिन्यात जयताळा, भांगे लेआऊट, वाडी, वाठोडा, पारडी, कामठी या सर्व भागात अशाच पद्धतीने अनेक गौवंशीय प्राण्यांची चोरी केली आहे.

सकाळी उठल्यानंतर गोपालकांना त्यांचे पशु जागेवर न दिसल्याने कदाचित ते दोरी सोडवून इकडे तिकडे भटकत असावे असे वाटायचे. त्यामुळे गोपालक त्यांच्या पशूंना अनेक दिवस नागपूर शहरात सर्वत्र शोधायचे.

मात्र, दिनेश भांगे नावाच्या गोपालकाच्या गायीची अशी चोरी सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. यामुळे गायींना पळवणाऱ्या टोळीचे कृत्य समोर आले आहे. ते कारने फिरून गायी पळवत असल्याचे उघड झाले.

नुकतीच एमआयडीसी पोलिसांनी या टोळीतील चौघांना अटक केली आहे. तर त्यांचा एक सदस्य फरार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *