Thu. Sep 29th, 2022

‘सगळ्यात मोठी बेईमानी आमच्यासोबत झाली होती’

मी उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार नाही, अडीच वर्षांचा फॉर्म्युला भाजपने कधीच सांगितला नव्हता, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री काय म्हणाले मला माहिती नाही, पण ते जे बोलले त्यात तथ्य आहे. अडीच वर्षांचा फॉर्म्युला कधीच नव्हता, असं उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो. मी साक्षीदार आहे, सगळ्या वाटाघाटी मी केल्या होत्या, यामध्ये अडीच वर्षांचा फॉर्म्युला नव्हता. सगळं काही निघून गेलं. ते बेईमानी बाबत बोलतात पण सगळ्यात मोठी बेईमानी आमच्यासोबत झाली होती. आमच्यासोबत जे निवडून आले ते जर आम्हाला सोडून विरोधकांशी हात मिळवणी करतात आणि सरकार स्थापन करतात, यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो?’ असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे.

२०१९ च्या निवडणुकीवेळी भाजप नेते अमित शाह मातोश्रीवर आले होते, तेव्हा त्यांच्याकडून अडीच वर्ष शिवसेनेचा तर अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरला होता, असा दावा शिवसेना पहिल्या दिवसापासून करत आहे. भाजपने मात्र वेळोवेळी हा दावा फेटाळून लावला होता. २०१९ ला फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, हे नरेंद्र मोदींपासून अमित शाहंपर्यंत सगळे नेते प्रचार सभेत बोलले होते, तेव्हा शिवसेनेकडून कोणताच आक्षेप का घेतला गेला नाही, असा सवाल भाजप नेते तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही उपस्थित केला होता. भाजपकडून अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला नसल्याचं पहिल्या दिवसापासून सांगितलं गेलं, पण एकनाथ शिंदे यांनी याबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.