Mon. Dec 6th, 2021

शाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती

उस्मानाबाद जिल्ह्यातील देऊळगाव या छोट्याशा गावात तब्बल सव्वाशे कोटी रुपयांचं आधुनिक मराठी ज्ञानमंदिर उभारलं जाणार आहे. १९९३ च्या भूकंपात हे गाव उद्ध्वस्त झालं होतं. शिक्षणासाठी गावात एकच जिल्हा परिषदेची शाळा,तीही मोडकळीस आलेली. अशा परिस्थितीत गावचे सुपुत्र सचिन सूर्यवंशी हे या शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले आणि त्यांनी ठरवलं. गावात आधुनिक शाळा उभारायची. कुणाच्याही मदतीची वाट न पाहता ते कामालाही लागले आणि त्यांनी शाळेच्या उभारणीसाठी स्वतःची तीन एकर जमीन विकली. हे पैसे त्यांनी शाळेच्या खात्यावर जमा ही केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर सूर्यवंशी स्वतःच्या पगारातील अकरा हजार रुपये दर महिन्याला शाळेसाठी देतात.

सचिन सूर्यवंशी यांना गावात सव्वाशे कोटी रुपयांची जिल्हा परिषदेची शाळा उभी करायची आहे मात्र यासाठी त्यांनी स्वतःची जमीन विकून जमा केलेली रक्कम तुटपुंजी पडतेय. शाळेच्या उभारणीसाठी त्यांनी एक नवीन संकल्पना मांडली आहे. लोकांना त्यांनी मदतीची हाक दिलीये.यामध्ये देशातील प्रत्येकाने या शाळेसाठी एक रुपयाची मदत केली तर सव्वाशे कोटी रुपये जमा होतील आणि या पैश्यातून त्यांच्या आधुनिक मराठी शाळेचे स्वप्न पूर्ण होईल असं त्यांना वाटतंय.

मंदिरातील दानपेटीतही दररोज करोडो रुपयांचं दान पडत. अशा परिस्थितीत प्रत्येकाने जर एक रुपया दिला तर सूर्यवंशी सरांच्या स्वप्नातील आधुनिक ज्ञान मंदिर सहज उभा राहू शकते.गरज आहे ती तुमच्या छोट्याच्या मदतीची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *