‘मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून सोयीचा इतिहास दिसला’ – देवेंद्र फडणवीस

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधत टीका केली. दरम्यान, आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत, त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून सोयीचा इतिहास पाहायला मिळाला. २५ वर्ष आम्ही युतीत सडलो असे मुख्यमंत्री भाषणात म्हणाले. परंतु २०१२पर्यंत युतीचे नेते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे होते. युतीचा निर्णय बाळासाहेब ठाकरे यांचाच होता. त्यामुळे याचा अर्थ तुम्ही बाळासाहेब यांच्या युतीच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत आहेत’, असे फडणवीस म्हणाले.
‘शिवसेना पक्षाच्या जन्माआधीच मुंबईत भाजपचा नगरसेवक, आमदार होता. तसेच १९८४मध्ये लोकसभेची निवडणूक तुम्ही भाजपच्या चिन्हावर लढवली होती’, याची आठवण देवेंद्र फडणवीसांनी करून दिली.
शिवसेनेने आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, शिवसेनेचे हिंदुत्व हे कागदावरचे हिंदुत्व आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. तसेच रामजन्मभूमी, बाबरी हे विषय शिवसेनेने सोडून दिले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामजन्मभूमीचा प्रश्न सोडवला आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वातच देशात मंदिरे उभे राहत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ठराविक मुद्द्यावर बोलण्याऐवजी राज्यावर लक्ष केंद्रीत करावे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच हिंदुत्व भाषणापुरते मर्यादित नसून ते जगावे लागते, आणि हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवले असल्याचेही फडणवीस म्हणाले.