Wed. Apr 14th, 2021

‘एका लग्नाची पुढची गोष्ट’चे ४०० प्रयोग

मराठी रंगभूमीला वाहून घेतलेले आजच्या पिढीतील नट असं ज्यांचं यथार्थ वर्णन प्रत्येक मराठी माणूस अभिमानानं करतो त्या प्रशांत दामलेंच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या सदाबहार नाटकाची ४००व्या प्रयोगाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. एका लग्नाची ही खुमासदार आणि खुसखुशीत गोष्ट रसिकांनी इतकी डोक्यावर घेतली की, लॅाकडाऊननंतर पहिला प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ करत त्यांनी प्रशांत दामलेंवरील प्रेमाची जणू पोचपावतीच दिली. रसिक मायबापानं दिलेल्या याच प्रेमाच्या बळावर ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक ४०० प्रयोगांचा टप्पा गाठण्यात यशस्वी झालं आहे.

प्रशांत दामले फाऊंडेशन आणि गौरी थिएटर्स निर्मित, सरगम प्रकाशित, झी मराठी प्रस्तुत ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’च्या पुढील प्रयोगांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यात ६ मार्च ते १४ मार्चपर्यंत ‘लग्नाळू आठवडा’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.

१)३९३ वा प्रयोग दीनानाथ नाट्यगृह विलेपार्ले येथे ६ मार्चला दुपारी ४:३० वा.

२)३९४ वा प्रयोग ठाण्यातील डॅा. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ७ मार्च रोजी दुपारी ४.३० वा.

३)३९५ वा प्रयोग गडकरी रंगायतन, ठाणे येथे १० मार्च रोजी रात्री ८:३० वा.

४)३९६ वा प्रयोग सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली येथे, ११ मार्च, दुपारी ४:३० वा.

५)३९७ वा प्रयोग प्र. ठाकरे नाट्यगृह बोरिवली येथे १२ मार्च रात्रौ ८.०० वा.

६)३९८ वा प्रयोग यशवंतराव चव्हाण, कोथरूड येथे, १३ मार्च, दुपारी १२:३० वा.

७)३९९ वा प्रयोग रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे १४ मार्च, दुपारी १२.३० वा.

८)४००वा प्रयोग बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे १४ मार्चला संध्याकाळी ५:३० वा. सेलिब्रेट करण्यात येईल.

सर्व प्रयोगांचं ऑनलाईन बुकिंग www.bookmyshow.com वर सुरु झालं आहे. ४०० व्या प्रयोगाला प्रमुख पाहुणे कोण? असं विचारता ते गुपित आहे पण तुमच्यासाठी सुखद धक्का असेल, असं दामले म्हणाले.

मराठी रंगभूमीवरील प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर ही सदाबहार जोडी आणि त्यांची ‘ऑनस्टेज’ केमिस्ट्री ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचं खरं वैशिष्ट्य आहे. रिपीट ऑडीयन्सने या नाटकाला खऱ्या अर्थानं आपल्या मनात स्थान दिलं आहे. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकानं मिळवलेलं हे यश रसिकांनी आमच्यावर केलेल्या प्रेमाचं प्रतीक असल्याची भावना प्रशांत दामले यांनी व्यक्त केली आहे. लाँकडाऊननंतर जेव्हा या नाटकानं मराठी रंगभूमीचा पडदा उघडला तेव्हाही रसिकांनी मनापासून प्रेम करत गर्दी करणं ही या नाटकाची पुण्याई आहे. आज आम्ही ४०० व्या प्रयोगापर्यंत पोहोचलो आहोत. पुढे आणखी मोठी मजल मारायची आहे. तेव्हाही रसिकांची अशीच साथ मिळेल अशी आशाही दामले यांनी व्यक्त केली आहे. या नाटकाची कथा इम्तियाज पटेल यांनी लिहिली असून, संहिता व दिग्दर्शन अद्वैत दादरकरनं केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *