Jaimaharashtra news

स्फोटांची जबाबदारी आयसिस-खोरासन गटाने स्वीकारली

अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर गुरुवारी झालेल्या स्फोटांची जबाबदारी ISIS-K (आयसिस-खोरासन) या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आयसिसच्या खोरासन या गटाने पश्चिम आशियामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या तिव्रतेचे बॉम्ब स्फोट घडवून आणले आहेत. सत्तेच्या आणि वर्चस्वाच्या राजकारणामध्ये आयसिसचा हा गट तालिबान्यांचा कट्टर शत्रू म्हणून ओळखला जातोय. आयसिसचा खोरासन हा गट अफगाणिस्तानच्या नांगरहर या प्रदेशातील आहे. या प्रदेशाला खोरासन प्रदेश असंही ओळखलं जातं.

या प्रदेशात २०१२ साली काही जिहादींनी एका गटाची निर्मिती केली होती. २०१४ साली पश्चिम आशियात आयसिस म्हणजे इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटाची स्थापना झाली आणि खोरासनचा हा गट त्यामध्ये सामिल झाला. आयसिसचे एकूण २० मॉडेल आहेत. त्यामध्ये सर्वात घातक मॉडेल म्हणून ISIS-K म्हणजे खोरासन गट ओळखला जातो. खोरासन गटामध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील युवकांची भरती केली जाते. ज्या युवकांनी तालिबानचा गट सोडलाय त्यांना या भरतीमध्ये प्राधान्य दिलं जातं.

सध्या या गटामध्ये ३००० कडव्या युवकांचा समावेश असून तालिबानसोबत त्यांचा कायम हिंसाचार सुरु असतो.या गटाने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक आत्मघाती हल्ले घडवून आणले आहेत तसेच या प्रदेशातील लोकांवर अगणित अत्याचार केले आहेत. ISIS-K ने मुलींच्या शाळा, रुग्णालयांवर हल्ले केले आहेत. अफगाणिस्तानमधील तालिबान या दहशतवादी गटाचा प्रमुख उद्देश हा अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत करणे हा होता, तो त्यांनी साध्य केला आहे. पण खोरासन गट हा आयसिसच्या जागतिक नेटवर्कचा एक भाग आहे.

Exit mobile version