विरोधकांच्या पत्रावर शिवसेना पक्षप्रमुखांची स्वाक्षरी नाही

देशातील वाढत्या हिंसाचाराच्या घटनांवरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रावर अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र, शिवसेना पक्षप्रमुखांची या पत्रावर स्वाक्षरी नाही. त्यामुळे शिवसेना संभ्रमात असल्याचा प्रश्न उद्भवत आहे तसेच देशात अराजक पसरत असल्याचा दावा भाजपाविरोधकांनी केला आहे.
देशात अनेक विषयांवरून हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे देशात घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांबद्दल विरोधकांची चिंता व्यक्त करणारे हे पत्र आहे. देशात घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांवर पंतप्रधान मोदी यांनी मौन पाळले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून सामाजिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न सुरू असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
विरोधकांकडून पंतप्रधानांना पाठवण्यात आलेल्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनही शिवसेना पक्षप्रमुखांनी स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे त्यांच्या स्वाक्षरीशिवाय पंतप्रधान मोदींना पत्र पाठवण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे मुख्यमंत्र एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, भाकपचे महासचिव सीताराम येचुरी, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्यासह अन्य महत्वाच्या नेत्यांच्या समावेश आहे.