Wed. Jun 19th, 2019

शरद पवार यांना ‘ही’ चूक पडली महागात?

0Shares

‘मी बी ध्यानात ठेवलंय’ असं म्हणत शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विरोध करणाऱ्यांना इशारा दिला खरा, पण कोल्हापूरकरांनी मात्र पवारांच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारली. खरंतर धनंजय महाडिक याना विरोध असतानाही पवारांनी उमेदवारी देण्याचं केलेलं धाडस त्यांच्या अंगलट आल्याचं दिसून येतंय. यामुळे मात्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला कोल्हापूरचा गड नेस्तनाबूत झालाय.

कोल्हापूरचा गड नेस्तनाबूत!

कोल्हापुरात शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांचा तब्बल 2 लाख 70 हजार मतांनी पराभव केलाय.

राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांना अपेक्षित नसलेला पराभव कोल्हापुरातून झाला.

खरंतर धनंजय महाडिक यांनी गेल्या पाच वर्षात सोयीची भूमिका घेतल्याने त्यांना बदलून दुसरा उमेदवार देण्याची मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती.

मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत पवारांनी महाडिक याना उमेदवारी दिली.

त्यामुळे गेल्यावेळी दगाफटका अनुभवलेल्या आमदार सतेज पाटील यांनी यावेळी आमचं ठरलंय म्हणत थेट शरद पवारांना आव्हान दिले.

कधीही राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर न दिसलेले धनंजय महाडिक मोठ्या साहेबांचे पाठबळ मिळाल्यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा सक्रिय झाले.

मात्र काँग्रेस सोबतच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याना सुद्धा महाडीकांची सोयीची भूमिका आवडली नव्हती.

त्याचा प्रत्यंतर थेट अजित पवारांसमोर धनंजय महाडिक यांचं भाषण रोखण्याच्या प्रकाराने पुढे आलं.

एवढा उघड विरोध असतानाही शरद पवारांनी आपला उमेदवार बदलला नाही.

त्यांना जेवढी आपल्या लेकीच्या निवडणुकीची चिंता होती तेवढीच कोल्हापूरच्या उमेदवाराची होती.

त्यामुळे तब्बल सहा वेळा पवार यांनी कोल्हापूर दौरे करून जोडण्या केल्या.

 

याचा परिणाम व्हायचा तोच झाला!

प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात तर ‘आमचं ठरलंय’ म्हणून विरोधी भूमिका घेणाऱ्या सतेज पाटलांना त्यांनी ‘तुमचं ठरलंय तर मी बी ध्यानात ठेवलंय’ म्हणत इशारा दिला. मात्र इर्षेला पेटलेल्या सतेज पाटलांनी ‘एक बार मैने डिसीजन ले लिया तो मैं किसकी नही सूनता’ म्हणत पवारांना प्रत्युत्तर दिलं.

राजकारणातल्या जाणत्या राजाच्या विरोधात कोल्हापूरकरांनी कौल देत महाडिक याना डावलले. राजकारणाचे अनेक डावपेच खेळणाऱ्या पवारांना मात्र त्यांच्या आजोळने नवा डाव शिकवला. मोदी लाटेत सुद्धा गेल्यावेळी पवारांना साथ देणाऱ्या कोल्हापूरकरांनी त्यांचा यावेळी निर्णय चुकला हे दाखवून दिलंय. कार्यकर्ते सांगत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणे नेत्याला किती महागात पडते याचा धडाही नेत्याला घालून दिलाय. त्यामुळे नेत्यांनी आता कार्यकर्त्यांचं ऐकायचं की आपल्या मनाचे निर्णय कार्यकर्त्यांवर लादायचे याचा विचार करण्याची वेळ आहे हे मात्र नक्की

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: