Sun. Oct 17th, 2021

वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी अमेरिकेत उडविले विमान

नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

मराठवाडा मागास असल्याचा समज नांदेडच्या एका चौदा वर्षीय मुलीने चुकीचा ठरवत सातासमुद्रापार झेंडा रोवला आहे .नांदेड जिल्ह्यातील कोंढा येथील जोगदंड कुटुंबातील चौदा वर्षीय मुलीने दि. २० जून रोजी अमेरिकेत विमान उडवून आकाशात झेप घेतली आहे. तिच्या या अभिमानास्पद कामगिरीने जोगदंड कुटूंबियासह संपूर्ण कोंढेकर ग्रामस्थांचा उर अभिमानाने भरून आला. तिच्या भावी कार्यास कोंढेकरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

कोंढा येथील रहिवासी असलेले केशवराव बालाजी जोगदंड यांचा मुलगा दिलीप केशवराव जोगदंड हे २० वर्षांपूर्वी अमेरिकेला स्थायिक झाले आहेत. तेथे त्यांनी दोरीवर विमान उडवून दाखविणे या विषयी संशोधन करून यशस्वी प्रयोग केला. याचा परिणाम त्यांची मुलगी कु.रेवा दिलीप जोगदंड हिच्या बालमनावर झाला. तेव्हा पासून तिने भविष्यात पायलट होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुढील वाटचाल सुरू केली आणि हे स्वप्न सत्यात उतरवले. कु. रेवा दिलीप जोगदंड ( वय १४ वर्षे ) हिने दि. २० जून रोजी चक्क विमान उडवून आकाशात यशस्वी झेप घेतली.

तिच्या यशाची बातमी कोंढा येथे कळताच तिचे आजोबा केशवराव जोगदंड आणि संपूर्ण जोगदंड परिवारासह कोंढेकर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. आपल्या गावातील मुलीने अमेरिकेत जाऊन पायलट होण्याचे स्वप्न साकार केल्याबद्दल ग्रामस्थांचा उर अभिमानाने भरून आला. या परिसरातील अनेक नागरिकांनी मुलीला भरभरून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *