युक्रेनचे राष्ट्राध्यक्षांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनद्वारे झालेल्या चर्चेनंतर युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर जेलेन्स्की यांनी ट्विट करत भारताचे आभार मानले आहेत. रशियाच्या आक्रमणाला युक्रेनकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तरासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिल्याचे वोलोदिमिर जेलेन्स्की यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. युद्धाच्या काळात भारतीय नागरिकांना केलेल्या मदतीबद्दल भारताने युक्रेनचे कौतुक केल्याचे जेलेन्स्की म्हणाले आहेत. तसेच युक्रेनमधील जनतेला करण्यात येणाऱ्या मदतीबद्दल आपण भारताचे आभारी असल्याचेही ते म्हटले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष वोलोदिमिर जेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली आहे. जेलेन्स्की यांच्यासोबत पंतप्रधान मोदी यांनी जवळपास ३५ मिनिटे फोनद्वारे चर्चा केली. युक्रेनमधील बदलत्या परिस्थितीवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या थेट संवादाचे कौतुक केले. युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन सरकारने केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी जेलेन्स्की यांचे आभार मानले. तसेच सुमीमधून भारतीय नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.