पंतप्रधानांच्या हस्ते होणार पुणे मेट्रोचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करणार आहेत. मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या १२ किमी लांब मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार असून त्यानंतर ते मेट्रोचा प्रवास करणार आहेत. तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही पंतप्रधान मोदी करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. पुण्यातील नागरी गतिशीलतेसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प आहे. २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. एकूण ३२.२ किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या १२ किमी लांब मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. हा संपूर्ण प्रकल्प ११,४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधला जात आहे. ते गरवारे मेट्रो स्थानकात प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पाहणी करतील आणि तिथून आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास करतील.
काय आहे पुणे मेट्रो प्रकल्प?
एकूण ३२.२ किमी लांबीचा पुणे मेट्रो मार्ग.
१२ किमी लांबीचा मेट्रो मार्ग तयार.
संपूर्ण प्रकल्पाचा खर्च ११,४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त.
२४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आलेली.
वनाज ते गरवारेपर्यंत दोन मार्ग सुरु होतील.
मेट्रोचे किमान तिकीट १० रुपये व कमाल २० रुपये.
परतीचे तिकीट ३० रुपये.
सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत मेट्रो सुरु राहील.
पंतप्रधानांना मानाचा फेटा
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (६ मार्च)रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे पुणे प्रशासनाकडून पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. पुणेकरांच्या वतीने, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याती प्रसिद्ध व्यावसायिक गिरीश मुरुडकर यांच्याकडून पंतप्रधान मोदींसाठी शाही फेटा तयार करून घेतला आहे.