Tue. May 18th, 2021

‘द शॉशांक रिडम्पशन’

शशांक पाटील , मुंबई : एका प्रेक्षकाला चित्रपटात काय हवं असतं थोडासा ड्रामा, चेहऱ्यावर हसू आणणारे काही सीन, सस्पेन्स आणि इमोशन आणि हे सर्व काही एकाच चित्रपटात मिळणार असेल तर त्याला सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणणं वावग ठरणार नाही. असाच ‘ऑल इन वन’ सिनेमा म्हणजे ‘द शॉशांक रिडम्पशन’. आतापर्यंत अनेक हॉलीवुड सिनेमे पाहिले, पण लक्षात राहिलेला किंवा मनात बसलेला सिनेमा म्हणजे ‘द शॉशांक रिडम्पशन’.


सन 1994 मध्ये म्हणजे तब्बल 26 वर्षांपूर्वी आलेला हा सिनेमा सद्याच्या प्रेक्षकांना देखील 2 तास 20 मिनिटं आपल्या जागेवर खिळवून ठेवेल यात शंका नाही. तर सिनेमा इतका उत्कृष्ट असण्यामागे एक नाही तर अनेक कारणं आहेत. सर्वात पहिलं म्हणजे सिनेमाची कथा प्रसिद्ध कादंबरीकार स्टिफन किंग यांच्या ‘रीटा हेवर्थ अँड शॉशांक रिडम्पशन’ या कांदबरीवर आधारीत आहे. त्यानंतर फ्रँक डाराबोंट यांनी या कांदबरीच्या सहाय्याने कथा लिहीत सिनेमाचं दिग्दर्शन केलय. तर कलाकारांचा विचार करता अँडी डफ्रेन हे मुख्य पात्र साकारलयं प्रसिद्ध अमेरिकन कलाकार टीम रॉबन्स यांनी. त्यानंतर सेकन्ड लीड रोल साकारलाय अमेरिकेचे जगविख्यात कलाकार मॉर्गन फ्रीमॅन यांनी. जगात कोणी देवाचा आवाज एकला नाही पण जर देव माणसांशी बोलत असता तर त्याचा आवाज नक्कीच फ्रीमॅन यांच्यासारखा असता, अशी उपमा मिळालेले फ्रीमॅन यांनी साकारलेला रेड या पात्राचा रोल म्हणजे प्रत्येकाला स्वत:वर प्रेम करायला लावणारं पात्र असाच आहे. या दोघांशिवाय बॉब गन्टन, विल्यम सॅडलर, क्लॅन्सी ब्राऊन या कलाकारांनी देखील आपल्या अप्रतिम अभिनयाने सिनेमांमध्ये जान ओतली आहे.


तर कलाकारानंतर सिनेमाची स्टोरी ही सुरुवातीपासून पेशाने एक बँकर असणाऱ्या पण एका दुहेरी हत्येच्या गुन्ह्याखाली आजन्म कारावासामध्ये गेलेल्या अँडी डफ्रेन याच्याभोवती फिरते. तर अँडीला शिक्षा झालेल्या शॉशांक रिडम्पशन या जेलमधील विविध पात्र आणि कारावासातील कैद्यांच जीवन यावर इतका अप्रतिम सिनेमा बनू शकतो हे सिनेमा पाहिल्याशिवाय कळत नाही. एक उच्चशिक्षित अँडी अचानक कारावासांत गेल्यानंतर तिथे कसे अमूलाग्र बदल करतो आणि स्वत:सह इतर कैद्यांच जीवन बदलून टाकतो हे पाहताना सारं काही अत्यंत रिअलीस्टीक असल्यासारंख वाटतं. विशेष म्हणजे हा रिअलॅस्टीकनेसच या सिनेमांचा प्लस पॉईँट असून अगदी आपल्या अवतीभवती हा सिनेमा चाललाय असच वाटतं. तर यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अँडी आणि रेड यांची निस्सीम मैत्री. बऱ्याच सिनेमांत मैत्री बळकट होण्यासाठी मित्र एकमेंकासाठी जीव देतात किंवा खूप काही मोठं करतात. पण यात रेड आणि अँडी हे एकमेंकासाठी असं काहीही न करता केवळ एकमेंकाच्या भावना शेअर करत कशी आपली दोस्ती अजरामर करतात हे पाहताना डोळ्यात किंचित पाणी आल्याशिवाय राहत नाही. चांगला सिनेमा म्हटलं की त्यातून काहीतरी उपदेशात्मक प्रेक्षकांना मिळणं अपेक्षित असतं आणि द शॉशांक रिडम्पशन सिनेमाचा विचार करता यातून प्रेक्षकांना मिळणारा संदेश म्हणजे, जर तुमच्यात टॅलेंट असेल तर कोणत्याही भिंती मग त्या एखाद्या कारावासाच्या असो वा परिस्थितीच्या तुम्हाला आणि तुमच्या टॅलेंटला रोखू शकत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *