Wed. Oct 27th, 2021

…म्हणून गावकऱ्यांनीच लावलं शाळेला टाळं

चांगले शिक्षण मिळत नाही म्हणून किंवा शाळेत सुविधा नसल्याने शाळेला ग्रामस्थांनी कुलूप ठोकल्याची बातमी आपण अनेकदा ऐकली असेल. मात्र परभणीमध्ये शिक्षक दांपत्याना धडा शिकविण्यासाठी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप लावल्याची वेगळीच घटना समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

जिल्ह्यातील गंगाखेडच्या धारखेड येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत गावातील आणि परिसरातील मुले-मुली शिक्षणासाठी येतात. शाळेत शिक्षक म्हणून शेख इमाम व त्यांच्या पत्नी शाळेवर प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

शेख दाम्पत्याला मात्र टिकटॉक’ ची चांगलीच भुरळ पडली आहे. या छंदा पोटी की काय या शिक्षकांनी चक्क शाळेतील विद्यार्थांनाच टिकटॉक’ व्हिडिओवर नाचण्यास तसेच व्हिडिओ तयार करण्यास भाग पाडले.

सर्व प्रकाराची माहिती शाळेबाहेर आली. तेव्हा मात्र ग्रामस्थांमध्ये गोंधळ उडाला. संतंप्त झालेल्या गावकऱ्यांनी शाळेला कुलूपच लावले. विशेष म्हणजे यावेळी गावातील महिला देखील मोठ्या संख्येने हजर होत्या.

शाळेतील मुली व मुलांना एकत्रीत गाण्यावर नाचण्यास सांगून त्याचा व्हिडीओ टिकटॉकवर टाकत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी शाळेसमोर मुलांना बसवून त्यांच्याकडून रोज घडत असलेल्या प्रकार केंद्र प्रमुखांसमोर तोंडी वदवून घेतला. हा सर्व प्रकार आपण वरिष्ठांसमोर मांडणार असल्याचं केंद्रप्रमुखांनी आश्वासन गावकऱ्यांना दिलं आहे.

विदेशात अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या टिकटॉक’ च्या प्रेमापोटी शेख दांपत्य चांगलंच अडचणीत  सापडण्याची शक्यता आहे. शिक्षण विभाग त्यांच्यावर नेमकी काय कारवाई करते हेच पाहणे आता औसुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *