#Coronavirus मुळे नाट्यगृहं बंद, मात्र पडद्यामागच्या कर्मचाऱ्यांसाठी अभिनेते प्रशांत दामले यांचा मदतीचा हात

प्रशांत दामले हे मराठी रंगभूमीवरील हाऊसफुल्लचे बादशाह आहेतच, पण त्याचसोबत ते एक माणुसकी जपणारे कलाकार असल्याचंही सध्याच्या Corona Virus मुळे निर्माण झालेल्या हाहाःकारादरम्यान दिसून आलं आहे. कोरोना व्हयरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक ठिकाणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमा हॉल, नाट्यगृह त्यामुळे बंद ठेवण्यात येत आहेत. मात्र अशा परिस्थितीत दर प्रयोगामागे पैसे मिळणाऱ्या पडद्यामागील लोकांच्या चरितर्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या लोकांच्या मदतीसाठी प्रशांत दामले पुढे आले आहेत.
अभिनेते निर्माते प्रशांत दामले यांनी आपल्या नाटकाचं बॅकस्टेज (पडद्यामागील काम) संभाळणाऱ्या 23 जणांना प्रत्येकी 10,000 रुपयांची मदत मदत दिली आहे. त्यामुळे सध्या नाटकाचे प्रयोग नसले, तरी सध्यातरी या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आधार मिळाला आहे.
प्रशांत दामले यांच्या या कार्याचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. अभिनेते प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोत्री यांनी पोस्टद्वारे ही माहिती देत दामले यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

प्रशांत दामले यांची सध्या रंगभूमीवर ‘साखर खाल्लेला माणूस’, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ ही दोन नाटकं सुरू हेत. तसंच त्यांची निर्मिती असलेलं ‘तू म्हणशील तसं’ हे नाटकदेखील रंगभूमीवर सुरू आहे.