‘…तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही’ – आशिष शेलार

त्रिपुरा हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. तसेच आता अमरावतीतील दंगलीमुळे राज्यात चर्चेला उधाण आले आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दंगलीबाबत भाजप नेत्यांवर आरोप केले आहेत. दंगली घडवण्याचे षडयंत्र भापनेच रचल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच भाजप नेते आशिष शेलार यांच्यावरही आरोप केले आहेत. यावर आशिष शेलारांनी मलिकांना प्रत्युत्तर दिले आहे.
नवाब मलिकांनी आशिष शेलार यांचा फोटो शेअर करत रझा अकादमीच्या नेत्यांसोबत काय करतो? असा सवाल उपस्थित केला. यावर आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘मलिक तुमची खोड काही जात नाही. अशापद्धतीने दरवेळी वेगवेगळ्या फोटोंच्या जीवावर अफवांचे राजकारण करणे हा तुमचा धंदा आहे. त्रिपुराच्या हिंसाचार घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेल्या दंगलीचा आणि २०१६-१७मधील फोटोचा संबंध काय?’ असा पलटवार करत आशिष शेलारांनी सवाल उपस्थित केला आहे.
‘माझ्या त्या फोटोचा आणि रझा अकादमीच्या फोटोसोबत काहीही संबंध नाही. ही बैठक रझा अकादमीच्या कार्यालयात झालेली नाही. तुमची खोड जाणार नसेल तर रझा अकादमीसोबतचे असंख्य फोटो आम्हाला दाखवावे लागतील. त्यावेळी तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही.’ असा इशाराही आशिष शेलारांनी मलिकांना दिला आहे.