औरंगाबादेत जमावबंदीचे आदेश नाही

औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले नसल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसापासून औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली असल्याची माहिती प्रसारमाध्यमांवर प्रसारित होत होती. मात्र, औरंगाबादेत जमावबंदीचे आदेश नाहीत, तर शस्त्रबंदी आणि प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.
औरंगाबादमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शस्त्रबंदी आणि प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला असल्याची माहिती औरंगाबाद पोलीस आयुक्त यांनी दिली आहे. २६ एप्रिल ते ९ मेपर्यंत हे आदेश लागू होणार आहेत. तसेच महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मनसेची सभा पार पडणार आहे. त्यामुळे या सभेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
राज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेबाबत पोलिसांनी अद्याप मौन बाळगलं आहे. मनसेच्या सभेसाठी अर्ज करून सहा दिवस झाले मात्र, अजूनही सभेसाठी पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबाद पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठ उभारण्याची तयारी केली आहे. मात्र, अद्याप राज ठाकरेंच्या सभेबाबत पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. त्याबाबत निर्णय झाल्यानंतर पोलिसांकडून अधिकृतरित्या माहिती देण्यात येईल, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या १ मे रोजी औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे.