Tue. May 17th, 2022

‘मदर मिल्क बँक’ चळवळ व्हावी

आई अन् मूल यांचे नाते जगातील सर्वात सुंदर नाते. या नात्याचे फक्त माणसाच्या आयुष्यात नाही तर सकल प्राणिजगतात अनन्यसाधारण महत्व अधोरेखित आहे. या नात्याची नाळ जन्माच्या आधीपासूनच जोडली जाते, अन् जन्मानंतर दुधारूपी अमृताने ती घट्ट होते. कर्ण असो, छत्रपती संभाजी राजे यांच्या नशिबी हे सुख अर्धवट होते. त्यावेळी राधाऊच्या रुपात हे अमृत मिळाले. तेच आज ‘मिल्क बँक’ या रूपाने समाजात आपली भूमिका अन् गरज अधोरेखित करत आहे. सध्याच्या वर्किंग मदरच्या जमान्यात ‘ह्युमन मिल्क बँकेची’ गरज अधोरेखित होऊ लागली आहे. मात्र या तुलनेत भारतात मदर मिल्क बँक उपलब्ध नसल्याने बाल मृत्यू ओढवत असल्याची स्थिती आहे. कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात ही मिल्क बँक लवकरच सुरू होत आहे. सध्याच्या काळात याची गरज पाहता ती चळवळ बनावी हीच अपेक्षा.

जगात ब्राझीलमध्ये मदर मिल्क बँकेची सर्वप्रथम सुरूवात झाली. प्रसूती झाल्यानंतर नवजात शिशुला वजन कमी असल्याने अथवा अन्य कारणाने पेटित ठेवले जाते. काही वेळा वर्किंग मदर असल्याने आईच्या दुधालाही मुकावे लागते. तर काही कारणाने आईला दूध येत नाही, अशा वेळी बाळाला आईचे दूध देणारी बँक म्हणून मिल्क बँकेकडे पाहिले जाते. आईच्या दुधात इम्युनोग्लोबूयलन्समुळे प्रतिकारशक्ती वाढीस लागते. आई आणि बाळाच्या मानसिकतेत दूरगामी सकारात्मक परिणाम होत असतात. त्यामुळे आईचे दूध खूप महत्वाचे असते. मात्र सध्या मिल्क बँकेची संख्या कमी असल्याने कृत्रिम दुधावर अवलंबून राहावे लागते. डॉक्टरांच्या मते, हे दूध आईच्या दुधात असलेली नैसर्गिक प्रतिकार शक्ती पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे बाळाची ही गरज पूर्ण करण्यासाठी ‘मदर मिल्क बँक’ गरजेच्या आहेत.

‘मदर मिल्क बँके’चे काम

रुग्णालयातील किंवा रुग्णालयाबाहेरील मातेकडून हे दूध संकलित केले जाते. तत्पूर्वी दुग्धदान करणाऱ्या आईला एचआयव्ही, कावीळ बी, सी, आणि सिफिलिस याच्या तपासण्या करून योग्य असेल तरच ते संकलित केले जाते. दूध हाताने किंवा पंपाच्या साहाय्याने एका कंटेनरमध्ये जमवतात. ६२.५ डिग्री सेल्सियसला उकळून त्याचे पाश्चरायझेशन केले जाते. त्यानंतर हे दूध ४ डिग्री सेल्सियसवर ३ दिवसांपर्यंत तर २० डिग्री सेल्सियसवर १२ तासांसाठी साठवून ठेवतात.

दूध साठवताना त्याचे वेगवेगळे वर्गीकरण 

कॉलोस्ट्रम

बाळाच्या जन्मानंतर पहिल्या चार-पाच दिवसांत आईकडून मिळालेल्या दुधाला ‘कॉलोस्ट्रम’ म्हणतात. सहसा हे दूध डायरिया, कुपोषण, गंभीर जंतुसंसर्ग व भाजलेल्या बाळासाठी राखून ठेवले जाते.

ट्रान्झिशनल मिल्क

त्या पुढील ५ ते १० दिवसांत जमवलेल्या दुधाला ‘ट्रान्झिशनल मिल्क’ म्हणतात. यात प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. त्यानंतर जमवलेल्या दुधाला ‘मॅच्युअर मिल्क’ म्हणतात.

हे दूध आवश्यकतेनुसार नवजात शिशुना देण्यात येते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, मिल्क बँकेतील दूध हे पाश्चराईज करून दिले जात असल्याने नैसर्गिक प्रतिकार शक्ती बाळाला मिळते. यामुळे १५ ते २० टक्के इन्फेक्शन कमी होते. शिवाय बालकांचा मृत्यू दर कमी करण्याससुद्धा मदत होते. अलीकडच्या काळात जन्मलेल्या मुलांपैकी ३० टक्के मुलांना पेटीत ठेवावे लागते, अशा मुलांना हे दूध उपयुक्त ठरणारे आहे. शिवाय काही कारणी आईला जास्त दूध येऊन स्तन कडक होणे, दुखणे याची भीती असेल, तर याचा असमतोल यामुळे कमी होतो.

अनेक वेळा आपण दवाखान्यात येऊन एखाद्या महिलेने बाळाला दूध पाजून त्याची गरज पूर्ण केल्याच्या घटना ऐकल्या, वाचल्या आहेत. अशा सर्व गरजा या ‘मदर मिल्क बँक’ पूर्ण करू शकतात. त्यामुळे त्याची गरज अधोरेखित होत असून केवळ कोल्हापुरातच नव्हे तर सर्वच जिल्ह्यात अशा मिल्क बँका सुरू होऊन त्याची चळवळ व्हावी हीच अपेक्षा आहे.

– ज्ञानेश्वर साळोखे, कोल्हापूर

( या मताशी संपादक अथवा प्रकाशन संस्था सहमत असतीलच असे नाही. या लेखात लेखकाने मांडलेली मते स्वतंत्र आहेत. )

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.